Thane-Ghodbandar Road Massive Traffic Jam : ठाणे- घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील 700 मीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. हे काम सुरु असेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील 700 मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्तीचे काम शुक्रवार (24 मे 2024) पासून केले जात आहे. या दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम केले जाणार आहे. या कारणामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर 6 जूनपर्यंत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. पण ही बंदी असूनही अवजड वाहने घोडबंदर मार्गावरुन गेल्याने प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. 


अवजड वाहनांची वाहतूक कोंडी 


सध्या ठाणे ते घोडबंदर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गांनी वळवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीचा हा पहिलाच दिवस असल्याने अनेकांना याबद्दलची माहिती नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. आता तात्काळ सर्व अवजड वाहने अन्यत्र वळवण्यात आली आहे. तसेच ही वाहतूक कोंडी दूर करण्यात आली आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ.विनयकुमार  राठोड यांनी दिली.


24 मे ते 6 जूनदरम्यानच्या अवजड वाहनांसाठी वाहतुकीतील बदल खालीलप्रमाणे - 


> गुजरातमधून घोडबंदर मार्गे ठाण्याच्या दिशेने येणार्या जड/अवजड वाहनांना चिंचोटी नाक्याजवळ प्रवेशबंदी असेल. ही वाहने चिंचोटी नाका येथून कामन, अंजुरफाटा मानकोली, भिवंडी मार्गाने जातील.


> मुंबई, ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड/अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजिवड्याजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेच्या ऑफिसजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गाने किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे पुढे निघतील.


> मुंब्रा, कळव्यावरुन घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या जड/अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद केला जाईल. ही वाहने खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली मार्गे जातील.


> नाशिककडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या जड/अवजड वाहनांना मानकोली नाक्यावर प्रवेशबंदी असेल. या वाहनांना मानकोली पूलाखालून अंजुरफाटा मार्गे जावं लागेल.