`ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालं`; दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरुन राजकारण तापलं
Gautami Patil Dance : दिवाळी पहाटच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन आता विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
Gautami Patil : दिवाळी पहाट निमित्त (Diwali Pahat) ठाण्यात (Thane) झालेल्या एका कार्यक्रमावरुन सध्या जोरदार चर्चा सुरुय. सबके कातिल, गौतमी पाटील म्हणून प्रसिद्ध झालेल्या लावणी डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil Dance) दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला ठाण्यात हजेरी लावली होती. खास दिवाळी पहाटनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने आदल्या दिवसापासून त्याची चर्चा सुरु होती. ठाण्याच्या तलावपाळीजवळील कार्यक्रमात सकाळीच लावणीच्या गाण्यावर गौतमीसह तिथं आलेली तरुणाई थिरकली. मात्र आता या कार्यक्रमावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे.
दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटाततील ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील येणार असल्यान तरुणाईने पहाटेपासूनच तिथं गर्दी केली होती. गौतमीने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ठाण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होती. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि वाद हे सध्या एक समीकरण झालं आहे. त्यामुळे ठाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र गौतमीने आपल्या नृत्यांने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. पण या कार्यक्रमावरुन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
"महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणी नी साजरी केली गेली. संस्कृती बदलली ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झाले," असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. यासोबत जितेंद्र आव्हाड यांनी गौतमीच्या डान्सचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
सुषमा अंधारेंचीही टीका
"दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पंडीत बिस्मिल्ला साहेबांची सनई, पंडीत भीमसेन जोशी यांची भक्तीगीते किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळं ऐकून होतो. आज ठाण्यामध्ये उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच काय, अवघ्या महाराष्ट्रालाही अपेक्षित नसेल," अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
मुंबईचे प्रेक्षक मला खूप आवडतात - गौतमी पाटील
'मला खूप छान वाटलं. मी नेहमी म्हणते की, मुंबईचे प्रेक्षक मला खूप आवडतात. मला नेहमी त्यांचं प्रेम मिळतं. सर्वजण पहाटे पाच-सहा वाजेच्यदरम्यान कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यामुळं छान वाटलं. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा', अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने कार्यक्रमानंतर दिली.