नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी सभागृहातील भाजप खासदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शेतकरी, नोकरदार आणि करदात्यांवर या अर्थसंकल्पात आश्वासनांची खैरात करण्यात आली. यापैकी पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा सर्वाधिक लक्षवेधी ठरली. त्यावेळी संसदेतील वातावरण अक्षरश: पालटले. यावेळी खासदारांना जोरजोरात मोदी-मोदी घोषणा द्यायला सुरुवात केली. जवळपास दीड ते दोन मिनिटे या घोषणा सुरु होत्या. हा आवाज इतका टिपेला पोहोचला की अर्थमंत्री पीयूष गोयल यांना काहीवेळासाठी आपले भाषण थांबवावे लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्तिकरात सवलत मिळण्याची मर्यादा आत्ताच्या अडीच लाख रुपयांवरून थेट दुप्पट करून पाच लाख रुपये करण्यात आली. याचा अर्थ पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांना, छोट्या उद्योजकांना त्यावर कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही. याबरोबरच प्राप्तिकरात सवलत मिळण्यासाठी ज्या विविध गुंतवणूक योजना आहेत. त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हीच सवलत साडेसहा लाख रुपयांपर्यंत राहील. प्राप्तिकर रचनेतील बदलांचा फायदा देशातील नोकरदार वर्ग, छोटे उद्योजक, व्यापारी, निवृत्तीवेतनधारक, ज्येष्ठ नागरिक यांना होणार आहे. देशातील तीन कोटी नागरिकांना या बदलाचा थेट फायदा होईल, असे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. 



सध्याच्या प्राप्तिकर रचनेनुसार अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना त्यांच्या उत्पन्नावर कोणताही कर लावण्यात येत नव्हता. अडीच ते पाच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या प्राप्तिकरदात्यांवर ५ टक्के इतका कर होता. पाच लाख ते १० लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱ्यांकडून २० टक्के इतका प्राप्तिकर वसूल केला जात होता. तर १० लाखांच्यावर उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांकडून ३० टक्के इतका प्राप्तिकर आकारला जात होता.