नागपूर - मराठमोळ्या धावपटू अविनाश साबळेने स्टीपलचेस शर्यतीत आठव्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे. मोरक्को येथे सुरु असलेल्या डायमंड लीग स्पर्धेत स्टीपलचेस शर्यतीत अविनाशने पाचव्या क्रमांकावर आला आहे. अवघ्या 8 मिनीट 12.48 सेकंदात दमदार कामगिरी करत नवीन राष्ट्रीय विक्रम अविनाशने प्रस्थपित केलाय. या शर्यतीत त्याने टोकियो ओलंपिक मधील कांस्यपदक विजेता केनियाचा बेंजामिन किंगेन याला मागे टाकत नवा विक्रम रचला आहे. ही शर्यत मोरक्कोच्या सौफेन बकालीने 7 मिनिट 58.28 सेकंदात जिंकली तर टोकियो ओलंपिक रौप्य पदक विजेता इथिओपियाच्या लांबीचा गिरमाने या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळचा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र आणि सेनादलात नायब सुभेदार असलेल्या अविनाशने चार वर्षांपूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत धावपटू गोपाळ सैनी यांचा 37 वर्षे जुना स्टीपलचेस विक्रम मोडला होता. त्यामागोमाग त्याने पाच हजार मीटर आणि अर्ध मॅरेथॉन शर्यतीत राष्ट्रीय विक्रमी आपल्या नावावर कोरले आहेत. अविनाशने स्टीपलचेसमध्ये 2018 पासून सुरू केलेली विक्रमी घौडदौड अजूनही 2022 मधील डायमंड लिगमधील कामगिरी पर्यंत कायम ठेवली आहे.


या स्पर्धेतील शर्यतीत अविनाशने ओलंपियन बेंजमिन कीगेन,आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अब्राहम किबिवोट यांना मागे टाकत मोठी मजल मारली आहे. जगातील अव्वल स्टीपलचेस स्पर्धकांना मागे टाकत अविनाशकडून भारताच्या भविष्यातील मोठ्या आशा वाढल्या आहेत. मोरक्को देशातील राबत इथल्या स्टीपलचेस कामगिरीनंतर अविनाश राष्ट्रकुल आणि अमेरिकेत होणाऱ्या जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. अविनाशची ही यशाची भरारी भारताला क्रीडा श्रेत्रात नव्या उंचीवर घेवुन जाणार हे निश्चित दिसत आहे.