मृतदेह नेण्यासाठी शववाहिकाही मिळेना; स्कूल बसमधून पोहचवले स्मशानभूमीत
कोरोना मुळे निधन होणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की, मृतदेह नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध होत नाहीये.
अमरावती : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरतोय. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येसोबत मृत्यूंच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना मुळे निधन होणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की, मृतदेह नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध होत नाहीये.
अमरावतीत दिवसेंदिवस कोरोनाचं थैमान वाढत आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतेय. आरोग्य यंत्रणा मोठ्या तणावात काम करीत आहेत. रुग्णवाहिका कमी पडताहेत.
कोरोना रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यास, त्यांना अंतविधीसाठी नेण्यासाठी शववाहिका किंवा रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीये.
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये निधन झालेल्या दोन कोरोना रुग्णांचे मृतदेह एकाच स्कूल बसमधून स्मशानभूमीत नेण्यात आले आहेत.
राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या यंत्रणा कोरोनामुळे प्रचंड तणावात असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट होत आहे.