अखंड भारत कधी होणार? RSS च्या मुख्यालयात तिरंगा का फडकवत नाही? मोहन भागवत म्हणाले, `तुम्ही या देशात...`
RSS Chief Mohan Bhagwat On Akhand Bharat: नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांना एका विद्यार्थ्याने अखंड भारतासंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी अखंड भारत कधी होणार हे सांगितलं.
RSS Chief Mohan Bhagwat On Akhand Bharat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी अखंड भारतासंदर्भात सूचक विधान केलं आहे. सध्याची तरुण पिढी वयस्कर होण्याआधीच अखंड भारताचं स्वप्न सत्यात उतरेल असं सरसंघचालक भागवत यांनी म्हटलं आहे. एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत यांनी हे विधान केलं. मात्र अखंड भारत कधी होणार यासंदर्भातील नेमकी काळमर्यादा भागवत सांगू शकले नाहीत.
कधी होणार अखंड भारत?
विद्यार्थ्याने अखंड भारत कधी पाहता येईल अशा अर्थाचा प्रश्न भागवत यांना विचारला. त्यावर, "तुम्ही या देशात काम करत राहिलात तर तुम्ही म्हतारे होईपर्यंत अखंड भारत साकार होताना पाहू शकाल. सध्या अशी स्थिती तयार झाली आहे की जे लोक भारतापासून वेगळे झाले होते त्यांना त्यांची चूक आता समजू लागली आहे. आता आपण पुन्हा भारतात सहभागी व्हावं असं त्यांना वाटत आहे. भारताचा भाग होण्यासाठी मनात असलेल्या सीमांची बंधनं त्यांना पुसावी लागणार आहेत. भारताचा भाग होणं म्हणजे भारताचा स्वभाव स्वीकारण्यासारखं आहे," असं भागवत यांनी म्हटलं.
आरएसएसच्या मुख्यालयावर झेंडा का नाही?
आरएसएसने 1950 ते 2002 दरम्यान नागपूरमधील मुख्य कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही याबद्दल भागवत यांना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना, "दर 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला आम्ही कुठेही असलो तरी राष्ट्रध्वज फडकावतो. नागपूरमधील महाल आणि रेशमीबाग या दोन्ही ठिकाणी झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. लोकांनी आम्हाला हा असला प्रश्न विचारता कामा नये," असं भागवत यांनी म्हटलं.
नेहरु ध्वजारोहण करताना झेंडा अडकला तेव्हा...
भागवत यांनी एका घटनेची आठवण सांगताना 1933 मध्ये जळगावजवळ काँग्रेसच्या तेजपुरमधील संमेलनामध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु 80 फूट उंच खांबावर असलेल्या झेंड्याचं ध्वजारोहण करत होते तेव्हा झेंडा मध्येच अडकला. त्यावेळेस जवळपास 10 हजार जण उपस्थित होते. त्या गर्दीमधून एक तरुण पुढे आला. तो त्या खांबावर चढला आणि त्याने अडकलेला झेंडा खाली आणला.
भागवत यांच्या दाव्यानुसार, नेहरुंनी त्या तरुणाला दुसऱ्या दिवशी अभिनंदन करण्यासाठी संमेलनामध्ये बोलावलं. मात्र तो तरुण आला नाही. नेहरुंना काही लोकांनी सांगितलं की तो आरएसएसच्या शाखेत जातो. भागवत यांच्या दाव्याप्रमाणे यासंदर्भात आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना समजलं तेव्हा ते या तरुणाच्या घरी गेले. त्यांनी त्याचं कौतुक केलं. या तरुणाचं नाव किशन सिंह राजपूत असं होतं.
"आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करतो. ध्वजारोहण होत असो वा नसो मात्र राष्ट्रध्वजाच्या सन्मानची गोष्य येते तेव्हा आमचे स्वयंसेवक सर्वात पुढे बलिदान देण्यासाठी तयार असतात," अलं मोहन भागवत यांनी सांगितलं.