नागपूर : आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. त्यामुळे केवळ मुंबई, ठाणे या शहरांचा विचार करू नका. राज्यातील इतर अन्य शहरे आहेत. त्यांचाही विचार करा. या शहरांनाही नव्या वर्षांची भेट द्या असा उपरोधिक टोला काँग्रेस माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्ष २०२२ ची भेट म्हणून आपण मुंबई व ठाणे येथील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली. मुंबई, ठाण्यातील तब्बल १६ लाख घरांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे, ही चांगली गोष्ट आहे.



मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर, देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच, नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी वसले असून महाराष्ट्राची उपराजधानी आहे. हे शहर देशाच्या प्रत्येक मोठ्या शहरांना जोडले गेले असून दळण-वळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. नागपूरमध्येही मोठ्या प्रमाणात ५००  चौरस फुटांपेक्षा  कमी  क्षेत्रफळ  असलेल्या  घरांच्या  वसाहती  आहेत.


ज्याप्रमाणे मुंबई व ठाणे येथील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर आपण माफ केलात. त्याचप्रमाणे उपराजधानी नागपूर येथील घरांसाठीसुद्धा मालमत्ता करमाफी घोषित करण्यात यावी, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला न्याय मिळेल. आपण राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे राज्यातील इतर शहरांचासुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे, असे डॉ. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.