पवारांची तिसरी पिढी राजकारणात; अजितदादांचे चिरंजीव निवडणूक लढवण्याच्या तयारीत?
पार्थ पवार हे शरद पवारांसोबत अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसले होते.
पुणे: ठाकरे घराण्यापाठोपाठ आता पवार कुटुंबीयांची जनरेशन नेक्स्ट राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने याविषयी अधिकृतरित्या भाष्य केलेले नाही.
अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.
पार्थ पवार हे शरद पवारांसोबत अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नागपुरात विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसची ६ आणि ७ ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक आहे. या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांचे आणि प्रदेशाध्यक्षांशी बोलून याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल. राजकारणात प्रवेश करण्याविषयी माझे पार्थशी बोलणे झालेले नाही. परंतु, हल्लीची पिढी स्वत:चे निर्णय स्वत: घेते, असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले.
शिवसेनेचे श्रीरंग बारणे सध्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण, पनवेल विधानसभा मतदारसंघ येतात.