पुणे: धरण क्षेत्रात सुरु असलेल्या चांगल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढतोय. जून महिना बऱ्यापैकी कोरडा गेल्याने पुणेकरांची चिंता वाढली होती. पुणे शहरात पावसाचा फारसा जोर जाणवत नसला तरी धरण क्षेत्रात तो बऱ्यापैकी स्थिरावलाय. पानशेत, वरसगाव, टेमघर तसंच खडकवासला धरणांतून पुणे शहराला पाणीपुरवठा होतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेमघरमध्ये आतापर्यंत १ हजार २६२ मिमी पाऊस झाला असून धरण २९.६४ टक्के भरलंय. पानशेतमध्ये ९०७ मिमी पाऊस झाला असून धरणात ५६. १० टक्के पाणीसाठा झालाय. त्याचप्रमाणे वरसगावमध्ये ८९९ मिमी पाऊस झालाय. खडकवासल्यात २६७ मिमी पाऊस झालाय. वरसगाव मध्ये २९. ६४ टक्के तर खडकवासल्यात ६०. ८६ टक्के पाणीसाठा झालाय. चारही धरणांत मिळून ११. ९३ टीएमसी म्हणजे ४०.९३ टक्के पाणीसाठा झालाय.  


मागील वर्षी आजच्या तारखेला या धरणांमध्ये ८.२० टीएमसी म्हणजेच २८.१३ टक्के इतका पाणीसाठा होता. यावर्षी त्यात सुमारे १२ टक्क्यांची वाढ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. पुण्याच्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस असला तरी लाभक्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस नाही. सर्वत्र पाऊस झाल्यास पाण्याचं नियोजन चांगल्याप्रकारे करता येणार आहे.