पुणे: पुणे महापालिकेतर्फे तळजाई टेकडीवर तयार करण्यात आलेल्या क्रिकेटपटू सदु शिंदे क्रिकेट स्टेडीयमचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवारांनी हातात चेंडू घेत चव्हाणांना गोलंदाजी केली. पवारांचा चेंडू आपल्या बॅटवर येतोय, अशी आशा चव्हाण बाळगून होते. मात्र, त्यांनी दोन्ही चेंडूंवर चकवा खाल्ला. अर्थात,  पवारांना चव्हाणांची दांडी उडवता आली नाही हे खरय. मात्र त्यांनी टाकलेले चेंडू टोलवणं देखील चव्हाणांना शक्य झालं नाही, हेही लक्षात घायला लागेल. पवारांनी दोन चेंडू टाकून झाल्यानंतर चव्हाणांनी गोलंदाजीसाठी चेंडू हाती घेतला. मात्र, तोवर पवार विकेट सोडून निघून गेले होते. आता पवारांच्या या अशा खेळण्याचा काय अर्थ निघतो याची चर्चा लगेचच सुरु झाली.


पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मंचावरूनही भाषणादरम्यान जोरदार बॅटिंग केली. महाराष्ट्राचा गाडा पुन्हा रुळावर आणायचा असेल तर पृथ्वीराज चव्हाण आणि आम्हाला एकत्रच काम करावे लागेल. चव्हाणांसारख्या समाजाविषयी आस्था असणाऱ्या आणि कर्तृत्ववान लोकांचा पक्ष न पाहता आम्ही त्यांना प्रोत्साहित करू, असेही पवारांनी यावेळी सांगितले.