पुणे: पुण्यातील हरिश्चंद्रगडावर काही ट्रेकर्स अडकल्याची घटना नुकतीच समोर आली होती. मात्र, स्थानिक आणि ट्रेकर्स टीमच्या मदतीने या साऱ्यांची सुखरुप सुटका झाली. रविवारी औरंगाबाद, कल्याण आणि मीरारोडचे २० ट्रेकर्स  हरिश्चंद्रगडावर गडावर गेले होते. कोकण कड्यावरून रॅपलिंग करून मुरबाड तालुक्यातल्या वेलपाडा मार्गाने परत येण्याचं त्यांचं नियोजन होते. मात्र, १८०० मीटर लांबीचा कोकणकडा उतरण्यासाठी या ट्रेकर्सकडे केवळ एक हजार मीटर लांबीचाच दोरखंड होता. त्यामुळे कड्याच्या अर्ध्यावर त्यांना थांबावे लागले. तोपर्यंत अंधार पडल्यामुळे परतीचा मार्ग शोधण्यात त्यांना अडचण आली. एका ट्रेकरने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर बचावकार्य सुरू झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद, लोणावळा, बदलापूर आणि कल्याणच्या गिर्यारोहकांशी संपर्क साधून त्यांना याठिकाणी बोलावण्यात आले.. या गिर्यारोहकांच्या मदतीनं उरलेला ८०० मीटरचा टप्पा पार करून तब्बल २७ तास अडकून पडलेल्या ट्रेकर्सची सुटका करण्यात आली. 


या गडावरून खाली उतरण्यासाठी तीन मार्ग आहेत. मुरबाडजवळच्या वेलपाडा गावातून जाणार रस्ता खराब असल्यामुळे त्याचा जास्त वापर होत नाही. अन्य ठिकाणांहून मार्ग चुकण्याची शक्यता अधिक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 


हरिश्चंद्र गडावर देशभरातून पर्यटन आणि रँपलिंगसाठी लोक येतात. मात्र, पुरेसं मार्गदर्शन न घेतल्यांमुळे तसंच नियोजनाचा अभाव आणि स्थानिक गाईडची मदत न घेता अनेकजण संकटात सापडतात. बदलापूरच्या चंदेरी गडावरही नुकत्याच अशा तीन घटना घडल्या होत्या.