पवारांचं होमपीच, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर भाजपची नजर; सुप्रिया सुळेंसाठी लढाई अवघड?
पुण्यात पुरंदर तालुक्यात आणि सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये दाखल होत आहेत.
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा एक मोठा मासा भाजपच्या गळाला लागला आहे. राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. 2024 साठी भाजपचं 'मिशन बारामती' हाती घेतल्याचे दिसत आहे. यामुळे सुप्रिया सुळेंसाठी बारामतीची लढाई अवघड होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुप्रिया सुळेंसमोर तगडं आव्हान
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुरंदर-हवेलीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे दादा अशी ओळख असलेले अशोक टेकवडे हे भाजपचं कमळ हाती घेतले आहे. टेकवडेंच्या भाजप प्रवेशामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंसमोर तगडं आव्हान उभं ठाकले आहे. अशोक टेकवडेंची पुरंदर मतदारसंघात ताकद आहे.. पुरंदरमधील राष्ट्रवादीतला मोठा गट टेकवडेंसोबत भाजप प्रवेश करणार आहे. टेकवडेंचा भाजपप्रवेश हा राष्ट्रवादी आणि खुद्द अजित पवारांसाठी धक्का मानला जात आहे. कारण, टेकवडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.
भाजपचं मिशन 45
लोकसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपनं मिशन 45 निश्चित केलंय. या मिशनसाठी सर्वात पहिला मतदारसंघ निवडण्यात आला आहे तो म्हणजे पवारांचं होमपीच, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा बारामती मतदारसंघ. भाजपनं बारामतीसाठी तयारी सुरु केली आहे.
भाजपचं मिशन बारामती
पुरंदर, दौंड, इंदापूर या विधानसभा मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रीत केले आहे. पुरंदरमध्ये शिंदे गटाचे विजय शिवतारेंची आधीच ताकद आहे. अशोक टेकवडेंच्या प्रवेशामुळे भाजपला पुरंदरमधून मोठं मताधिक्य मिळू शकते. दौंडमधून राहुल कुल यांनी 2014, 2019 ला चांगलं मताधिक्य मिळवून दिलं होते. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांची संघटात्मक बांधणी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे बारामती दौरे निश्चित करण्यात आले आहेत.
अमेठीतून गांधी कुटुंब हरु शकतं तर बारामतीतून पवार कुटुंब का नाही?
कर्नाटक निकालांनंतर विरोधकांमध्ये ऊर्जा संचारलीय. लोकसभा जागांच्या दृष्टीनं उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्र देशातलं सर्वात मोठं दुस-या क्रमाकांचं राज्य आहे. 2014, 2019 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजप-शिवसेना युतीला मोठं यश मिळालं होतं..मोदींना पुन्हा एकहाती सत्ता मिळवायची असेल तर महाराष्ट्रातून जास्तीतजास्त जागा निवडून आणाव्या लागतील. त्याचदृष्टीनं भाजपची मोर्चेबांधणी सुरु आहे.. अमेठीतून गांधी कुटुंब हरु शकतं तर बारामतीतून पवार कुटुंब का नाही? असा पवित्रा घेऊन भाजप मैदानात उतरल्याची चर्चा आहे.