पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी टिप्पणी करून अमृता फडणवीस यांनी वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांचे पती देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी देवेंद्र यांनी म्हटले की, अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत. त्या कधी राजकारणात येतील, असे मला वाटत नाही. सोशल मीडियावर काहीतरी बोलल्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल व्हावे लागले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथ पेशव्यांची बुद्धी भ्रष्ट केली'


अमृता फडणवीस यांनी रविवारी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्याविषयी टिप्पणी केली होती. केवळ ठाकरे आडनाव असून भागत नाही. त्यासाठी व्यक्तीला तत्वांचे प्रामाणिकपणे पालन आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करावे लागते. त्यासाठी स्वत:चे कुटुंब आणि सत्ताकारणापलीकडे जाऊन विचार करावा लागतो, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले होते. 



अमृता यांच्या वक्तव्यावर शिवसैनिक चांगलेच भडकले होते. सोशल मीडिया आणि आंदोलनाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी अमृता फडणवीस यांना लक्ष्य केले होते. महाराष्ट्राला अमृता फडणवीस नाव हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर कळाले. त्यापूर्वी अमृता फडणवीस यांच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. याउलट ठाकरे घराण्यातील चार पिढ्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी आधी स्वत:चे घर सांभाळावे आणि मग आम्हाला सांगावे. अन्यथा आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांनी दिला होता.