पुणे: कोथरूडमध्ये दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना जाब विचारायला गेलेल्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी धक्काबुक्कीत जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली असली तरी यावरुन कोथरुडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
येथील सहजातानंद सोसायटीच्या रोडवर शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता हा प्रकार घडला. याठिकाणी एक गृहस्थ आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सोसायटीच्या परिसरात अमर बनसोडे, विनोद गंदे, तेजस कांबळे आणि आणखी एक तरुण दारु पीत होते. यावेळी कुत्रा त्यांच्या अंगावर भुंकला. तेव्हा तुम्ही आमच्या अंगावर कुत्रा सोडता काय, असे बोलत हे तरुण आक्रमक झाले. त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे संबंधित गृहस्थ घाईघाईने सोसायटीत निघून गेले. मात्र या तरुणांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना बाटली फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आवाज ऐकून सोसायटीतील राहुल कोल्हे आणि विलास कोल्हे तरुणांना जाब विचारायला गेले. तेव्हा या तरुणांनी या दोघांनाही मारहाण केली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा आरडाआरोड सुरु असताना मेधा कुलकर्णी त्याठिकाणी पोहोचल्या. त्यांनी आणि इतर लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आम्ही तुमचा मुडदा पाडू, अशी धमकीच या तरुणांनी दिली. नशेत असलेले हे तरुण समोर येईल त्या प्रत्येकाला धक्काबुक्की करत होते. या झटापटीत मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. यानंतर पोलिसांनी अमर बनसोडे, विनोद गंदे, तेजस कांबळे आणि मिथुन हरगुडे यांच्यावर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आतापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.