Hamid Dabholkar On Narendra Dabholkar Murder Case Verdict: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्याप्रकरणी तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाने निकाल दिला आहे. दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली आहे. तर या प्रकरणातील विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालानंतर नरेंद्र दाभोलकरांचे पुत्र हमीद दाभोलकरांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.


आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात ही लढाई घेऊन जाऊ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकालानंतर पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हमीद दाभोलकर यांनी निर्दोष सुटलेल्यांविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात जाणार असं म्हटलं आहे. "न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो. नरेंद्र दाभोळकरांच्या खूनानंतर आम्ही न्यायालयावर आणि इथल्या न्यायव्यवस्थेवर सातत्याने विश्वास ठेवत आलो. आत त्या प्रकरणात दोन जणांना जे संशयित आरोपी होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. एका पातळीवर हा न्याय झालेला आहे. उरलेले जे 3 आरोपी सुटलेले आहेत. याविरुद्ध आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही जाऊ," असं हमीद दाभोलकर म्हणाले.


माणसाला मारुन विचार संपवता येत नाही


"प्रत्यक्ष माणसाला मारुन त्याचा विचार संपवता येत नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या निधनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही पण निर्धाराने सुरु राहिलेलं आहे हे अधोरेखित आहे. ज्या विचारधारांकडे संक्षयाची सुई होती त्यावर आज न्यायालयाच्या निकालाने शिक्कामोर्तब झालेलं आहे," असं हमीद दाभोलकर म्हणाले.


प्रत्यक्ष सूत्रधाराला अटक नाही


"दोन जणांना शिक्षा झाली ही निश्चित समाधानाची बाब आहे. प्रत्यक्ष मारेकरांना शिक्षा झाली ही समाधानाची बाब. मात्र या कटामध्ये जे सूत्रधार होते त्यातही जो प्रत्यक्ष सूत्रधार होता त्याला मात्र अटक झालेली नाही. जे बाकीचे सूत्रधार आहेत त्यांची सुटका झाली आहे त्याविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ," असंही हमीद दाभोलकरांना सांगितलं.


नक्की वाचा >> दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'


कधी झालेली दाभोलकरांची हत्या?


20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला गेले असताना पुण्यातील विठ्ठल नामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती. पुणे पोलिसांना तपास केल्यानंतर 2014 ला तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. हत्या, गुन्ह्याचा कट रचणे, शस्त्रासंदर्भातील कायद्यांअंतर्गत गुन्हे सिद्ध झाले. आरोपींविरोधात युएपीए कायद्याअंतर्गतही कलम लावण्यात आले.