Kolhapur Crime News : गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली होती. या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट आला आहे. या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, या तरुणाचा मृत्यू विहीरीत बुडून नाही तर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. मृत तरुणाच्या कुटुंबियांनी या आरोप केला आहे. या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाचार्डे येथे ही घटना घडली होती. प्रेयसीच्या निमंत्रणावरून तिला भेटायला तिच्या घरी  गेलेल्या प्रियकराचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.  तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात आता धक्कादायक अपडेट समोर आली आहे. 


प्रेयसीने फोन करून भेटायला बोलावले


प्रेयसीने फोन करून प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलावून घेतलं, पण नंतर घरचे अचानक आल्याने रात्रीच्या अंधारात पळत जात असताना अल्पवयीन प्रियकराचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी समोर आल होत. पण, नंतर मात्र या प्रकरणाला वेगळं स्वरूप प्राप्त झाल आहे.  वाकी इथला अल्पवयीन प्रियकर याचा प्रियेसीच्या घरच्यांनी बांधून घालून खून केल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी भुदरगड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.  या प्रकरणी 9 संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाच्या मैत्रिणीने मध्यरात्री भेटण्यासाठी फोन करून बोलावले होते. त्यानुसार हा तरुण तिच्या घरी गेला. दरम्यान मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास नातेवाईक घरी पोहचले. त्यावेळी मृत तरुण आणि त्याची प्रेयसी दोघे एकत्र सापडले. त्यामुळे तरुणीच्या नातेवाईकांनी त्याला बांधून घातलं आणि पोलीस पाटलांना कळविले. मात्र, हा तरुण हिसडा मारून तिथून रात्रीच्या अंधारात निघून गेला. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला, तरी देखील तो शेतातून पळत पुढे जात राहिला. त्यानंतर मात्र कठडा नसलेल्या विहिरीत जावून पडला.


पण, आत्ता मात्र या प्रकरणाला वेगळं स्वरूप प्राप्त झालं आहे. तरुणाच्या वडिलांनी शुभंकर याचा घातपात केल्याची तक्रार भुदरगड पोलिसात दिली आहे. इतकच न्हवे तर घरी सापडल्यानंतर त्याला बांधून बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे. या तक्रारीनुसार एकनाथ दिनकर कांबळे, संजय सत्तापा कांबळे, रंगराव लक्ष्मण कांबळे, आकाश ज्ञानदेव कांबळे, अक्षय अंकुश कांबळे, आदर्श रंगराव कांबळे, प्रवीण दत्तात्रय कांबळे , महेश शंकर कांबळे (रा. नाधवडे), अक्षय आनंदा कांबळे (रा. आडोली, ता. राधानगरी) यांच्यावर भुदरगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.