दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार असल्याचे समजते. यावेळी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, एका वृत्तपत्राशी संवाद साधताना प्रिया बेर्डे यांनी या बातमीला दुजोरा दिल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल, असे प्रिया बेर्डे यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी गायक आनंद शिंदे यांनाही राष्ट्रवादी विधानपरिषदेवर पाठवणार असल्याची चर्चा होती. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून आनंद शिंदे यांची वर्णी लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली सुरु होत्या. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रिया बेर्डे यांची नियुक्ती होणार आहे.  प्रिया बेर्डे  सध्या पुण्यातच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे आपण पुण्यातूनच नव्या कामाला सुरुवात करणार असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले.