Kapil Dev On Cricketers Politics : काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा आणि मराठमोळा फलंदाज केदार जाधव याने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं होतं. किर्ती आझाद, गौतम गंभीरपासून आत्ताच्या युसूफ पठाणपर्यंत अनेक खेळाडूंनी राजकीय नशिब (Cricketers In Politics) आजमवलं आहे. काहींनी राजकीय मार्ग निवडला, तर काहींनी क्रिकेटमध्येच पुनरागमन करणं योग्य समजलं. क्रिकेट आणि राजकारण यांच्यातील स्नेहसंबंध गेल्या काही वर्षात वाढल्याचं दिसून येत आहे. अशातच आता 1983 साली वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या कपिल देव (Kapil Dev) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल देव काय म्हणाले?


चांगल्या राजकारण्याने हा देश चालवावा, असं प्रत्येक नागरिकाला वाटत असेल तर मतदानाच्या या उत्सवात सर्वांनी सहभाग घेऊन मोठया संख्येन मतदान करणं गरजेचं आहे, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे. तसेच जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना कोणतीही टीका करण्याचा अधिकार नाही, असं परखड मत माजी क्रिकेटपटू आणि पद्यभूषण कपिल देव यांनी पुण्यात व्यक्त केलं. पुण्यातील खराडी इथल्या मणिपाल हाँस्पिटलच्यावतीने आँर्थोपेडिक्स उपचारांकरता प्रगत रोबोटिक पद्धतीचं अनावरण कपिल देव यांच्या उपस्थित पार पडलं. माफक दरात या रोबोटिकच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यानिमित्तानं कपिल देव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


हल्ली राजकारणात खेळाडूंचाही प्रवेश होत आहे. जर राजकारणी व्यक्ती खेळांच्या व्यवस्थेत लक्ष घालत असतील तर खेळांडूनीही राजकारणात का जाऊ नये? असा मार्मिक टोलाही राजकारण्याांना कपिल देव यांनी लगावला आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात तसेच राजकीय वर्तुळात देखील कपिल देव यांच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे. कपिल देव यांनी केलेलं वक्तव्य योग्य असल्याचं मत देखील काहींनी वर्तवलं आहे. क्रिकेटच्या वर्तुळात राजकीय हस्तक्षेप नेहमी दिसून येतो. त्यामुळे अनेकदा चुकीचे निर्णय देखील घेतले जातात. त्यामुळे कपिल देव यांचं वक्तव्य खऱ्या अर्थाने वैचारिक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 


दरम्यान, मोहम्मद कैफ, नवज्योतसिंग सिद्धू, मोहम्मद अझरुद्दीन, कीर्ती आझाद, मनोज प्रभाकर, पालवणकर बाळू, विनोद कांबळी, लक्ष्मी रतन शुक्ला, चेतन चौहान, एस श्रीशांत, अंबाती रायडू, मनोज तिवारी, हरभजन सिंग, गौतम गंभीर, युसूफ पठाण यांच्यासारख्या बड्या खेळाडूंनी राजकारणाच्या मैदानात पाय रोवले होते. त्यातील अनेकांनी पुन्हा क्रिकेटकडे लक्ष देणं सुरू केलं होतं.