Pune Women Died In Road Accident: सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून अल्पावधित लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न हल्ली अनेक तरुण करताना दिसतात. यासाठी रिल्स हे नवीन माध्यम मागील काही वर्षांपासून वेगवगेळ्या प्लॅटफॉर्मवरुन उपलब्ध झालं असून आता जवळजवळ सर्वच प्लॅटफॉर्मवर थोड्याफार फरकाने रिल्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र रिल्स बनवताना अनेक तरुण स्वत:चा आणि आजूबाजूच्यांचा जीवही धोक्यात टाकतात. असाच प्रकार पुण्यामध्ये घडला असून यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील महमदवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास 2 तरुण रिल्स बनवत असताना ही घटना घडली. स्टंटबाजीच्या नादात रिल्स बनवणाऱ्या दोन तरुणांच्या मोटरसायकलने बाजूने जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. यातच तिचा मृत्यू झाला. तस्लिमा पठाण असं मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे. तस्लिमा 31 वर्षांची होती. या प्रकरणामध्ये वानवाडी पोलिसांनी 2 तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयान आणि झायद असं या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 


जागीच मृत्यू...


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयान आणि झायद हे दोघेही बाईकवर स्टंट करत होते. सोशल मीडियावर रिल्स अपलोड करण्यासाठी ते मोबाईलवरुन शुटींग करतानाच स्टंटबाजी करत होते. या दोघांची स्टंटबाजी सुरु होती त्याच रस्त्यावरुन तस्लिमा पठाण तिच्या दुचाकीवरुन घरी जात होती. यावेळी आयान शेख हा बाईक चालवत रिल्स बनवण्यासाठी स्टंट करत होता तर दुसऱ्या बाजूला झायद हा व्हिडिओ काढत होता. स्टंटबाजी करणाऱ्या आयानचे बाईकवरील नियंत्रण सुटलं. आयानच्या अनियंत्रित बाईकने तस्लिमाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धकडकेत तस्लिमा दुचाकीवरुन खाली पडली. तस्लिमाच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार घडताच त्या दोघांनी तिथून पळ काढला.


दोघांना अटक


पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सोशल मिडियावर रिल्स बनवण्यासाठी हे दोघे ही तिथे आले असता ही घटना घडली असल्याने त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.