दर महिन्याला मेंस्ट्रुअल कप वापरणं कितपत योग्य?
प्रत्येक मासिक पाळीत मेंस्ट्रुअल कप वापरणं योग्य आहे का?
मुंबई : मासिकपाळी दरम्यान महिला आजकाल अनेक साधनांचा वापर करतात. यामध्ये सॅनिटरी नॅपकीन, टॅम्पॉन तसंच मेन्स्ट्रुअल कप इत्यादी. मात्र अनेकदा महिला मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी घाबरतात. मुळात मेंस्ट्रुअल कप वापरण्याची योग्य पद्धत माहिती असणं फार गरजेचं आहे. मात्र प्रत्येक मासिक पाळीत मेंस्ट्रुअल कप वापरणं योग्य आहे का?
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, मेंस्ट्रुअल कप वापरणं सुरक्षित आहे, मात्र काही परिस्थितीमध्ये याचा वापर करणं तुम्ही टाळलं पाहिजे. डॉ तनाया नरेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये, कोणत्या परिस्थितीत कपचा वापर करणं टाळलं पाहिजे याची माहिती देण्यात आली आहे.
सिलिकॉन एलर्जी
मेंस्ट्रुअल कप हा रबर किंवा सिलिकॉनने बनलेला असतो. डॉ. नरेंद्र हिच्या म्हणण्याप्रमाणे, जर तुम्हाला सिलिकॉनची एलर्जी असेल तर तुम्ही या प्रकारचे कप वापरू नये. असं केल्यास योनीमार्गाच्या आतील बाजूस किंवा बाहेरील बाजून सूज किंवा लालसरपणा येऊ शकतो.
इंट्राटेरिन डिव्हाइस
इंट्राटेरिन डिव्हाइस हे एक गर्भनिरोधक उपकरण आहे. हे उपकरणं डॉक्टरांद्वारे योनीमार्गात लावलं जातं. त्यामुळे जर तुम्ही या उपकरणाचा वापर केला असेल तर मेंस्ट्रुअल कप वापरू नये.
योनीमार्गाची शस्त्रक्रिया झाली असल्यास
तुमची अलीकडेच योनीमार्गाची शस्त्रक्रिया, गर्भपात किंवा प्रसूती झाली असेल तर मेस्ट्रुअल कप आणि टॅम्पोन्सचा वापर कमीत कमी सहा आठवड्यांपर्यंत करू नका. किंवा याचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.