मुंबई : राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनची दहशत असताना आता परदेशातून महाराष्ट्राच्या विविध भागात आलेले अनेक  प्रवासी गायब झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती जारी केली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता असलेले हे सगळेच प्रवासी अती धोकादायक देशांमधून मुंबईत आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात 
देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कर्नाटकात सापडला. यानंतर पाहता-पाहता ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या देशात 23 वर गेली आहे. यातील  सर्वाधिक म्हणजे 10 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.


मुंबईत काल नव्याने 2 रुग्ण आढळून आल्याने राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांचा एकूण आकडा हा 10 वर पोहचला आहे. यापैकी एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबात ६ रुग्ण सापडले आहेत. मुंबईत २ रुग्ण सापडले असून यात १ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर डोंबिवली आणि पुण्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे.


अनेक प्रवासी नॉट रिचेबल
जगभरात ओमायक्रॉनचा धोका वाढल्यानंतर अनेक भारतीय पुन्हा मायदेशात परतत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक प्रवासी भारतात परतले आहेत. पण यापैकी अनेक प्रवासी गायब झाले आहेत, तर अनेकांचे फोन नॉट रिचेबल आहेत. 


नागपुरमधे अती धोकादायक देशांतून आलेले ३० प्रवासी गायब आहेत. सांगलीत ७६ जण अजून सापडलेले नाहीत. तर कल्याण डोंबिवलीत १२ लोक बेपत्ता आहे. औरंगाबादमध्येही परदेशातून आलेल्या एका प्रवाशाचा शोध घेतला जात आहे. 


चिंतेची बाब म्हणजे या बेपत्ता लोकांमघील अनेक लोकांचे फोन बंद आहेत अनेकांचे  पत्ते हे अपूर्ण आहे त्यामुळे प्रशासनाचं टेंशन वाढलं आहे.  परदेशातून आल्यानंतर त्यांनी आपले मोबाईल क्रमांक आणि पत्ता नमूद केला होता. परंतु, या सर्वांचे मोबाईल फोन बंद आहेत. त्यांनी दिलेला पत्ता तपासून पाहिला असता तो देखील खोटा निघाला आहे. आता हे लोक जोपर्यंत ट्रेस होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात चिंता कायम राहणार आहे.


ओमायक्रॉनची लक्षणं सुपर माइल्ड
महाराष्ट्रासह भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत असले तरी, त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे भारतात सापडलेल्या ओमायक्रॉन रुग्णांमध्ये अतिशय सौम्य प्रकारची लक्षणं आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद नाही.