पुणे :  करिअरची निवड करताना आपल्यावर अनेकदा इतरांचा प्रभाव असतो.  एखाद्या चौकटीत राहून आपण त्याची स्वपन पाहतो. कधी कधी करिअरची गणितं चूकतात आणि त्यातून नैराश्य येतं. हा प्रकार प्रामुखयाने महिलांसोबत अधिक होतो. कारण त्यांची अनेकदा करिअरसोबत इतर गोष्टींचा प्राधान्यक्रम सतत बदलत असतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात राहणार्‍या पर्णिता तांदुळवाडकर हीच्या बाबतीतही हेच झाले. सीएचा अभ्यास करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. अभ्यास करत असतानाचं त्यांचं लग्न झालं. त्यामुळे करिअर घडवण्याआधीच त्यांना संसाराची घडी लावण्यात वेळ द्यावा लागला. पण त्यातूनही सकारात्मक विचार करून काँगेनिअलिटी मिसेस इंडियापर्यंत बाजी मारण्यात त्या यशस्वी ठरल्या. 


लहानपणापासूनच हुशार असलेल्या पर्णिता यांनी बारावीनंतर सीए करायचं ठरवलं. सीएचा अभ्यास सुरू असतानाच त्यांचं लग्न झालं. लग्नानंतरही त्यांनी सीएचा अभ्यास सुरू ठेवला. पण काही केल्या यश मिळेना. पुढे संसार, मुलं-बाळं आणि त्यातच करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे पर्णिता फार चिंतीत होत्या. पण फक्त हातावर हात ठेवून आला दिवस ढकल असं करणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं. बाळंतपणामुळे वाढलेलं वजनही त्यांच्या नैराश्याचं कारण होतं. आत्मविश्वास कमविण्यासाठी त्यांनी आधी स्वतः फिट राहण्यास सुरुवात केली. नियोजित व्यायामाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली.


सतत भविष्याच्या चिंतेत असलेल्या पर्णिता आता आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहू लागल्या. यातूनच त्यांना काँगेनिअलिटी मिसेस इंडियाचा पुरस्कारा मिळाला. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे असं त्या म्हणतात. मिसेस इंडियाचा किताब मिळाल्यानंतर त्यांनी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देणं चालू केलं . पर्सनालिटी ग्रुमिंगकडे त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. मेकअप ग्रुमिंगपासून ते एकंदरीत देहबोलीतील बदल आणि वागण्याबोलण्यातील बदल कसे असावेत याविषयी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. 


सॉफ्ट स्किल ट्रेनर या क्षेत्रात त्या आता बर्‍याच स्थिरस्थावर झाल्या आहेत. याद्वारे कित्येकांना त्यांनी स्वतःचं आयुष्य परत केलं आहे.  आपल्याकडे आलेला एखादा वैफल्यग्रस्त माणूस आपल्याशी बोलल्याने आणि आपल्या सल्ल्याने पुन्हा आनंदी जीवन जगत असेल तर यापेक्षा चांगलं काम या जगात दुसरं काहीच नाही. 


महिलांना लग्नानंतर स्वतःचं वेगळं अस्तित्वतच उरत नाही. आपण आपल्याला महत्व दिलं तरंच इतर आपल्याला महत्व देतात. स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आपल्याला अनेक विकार जडतात. या विकारांपासून दूर राहायचं असेल तर आतापासूनच प्रत्येकांनी स्वतःकडे लक्ष द्यायाला सुरुवात करायला हवी. आपण आनंदी असतो तेव्हाच संपूर्ण घर आनंदी राहतं. त्यामुळे इतरांच्या आनंदासाठी आधी स्वतःकडे लक्ष देऊन थोडावेळतरी स्वतःसाठी देणं गरजेचं आहे असं पर्णिता सांगतात. 


सीएपासून सुरू झालेलं त्यांचं करिअर लग्नानंतर मिसेस इंडियाच्या किताबामुळे पुर्णपणे बदलून गेलं. आपल्याला आलेल्या अडचणी इतरांना येऊ नये आणि आल्याच तरी त्यांना त्यातून बाहेर काढता यावं यासाठी त्यांनी उचलेलं पाऊल फार मोलाचं आहे. दुसर्‍यांच्या आयुष्यात आलेलं दुःख आपण आपल्या कलेने हलकं केलं तर आपल्यालाही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला मिळतं, म्हणूनच या क्षेत्रात आल्यानंतर मी पूर्वीपेक्षाही फार आनंदी आहे असं पर्णिता अभिमानाने सांगतात.