प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर वय आड येत नाही आणि हेच दाखवून देताहेत 'त्या तिघी'... वयाची पंचेचाळिशी ओलांडल्यानंतरही शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलवर करतात आणि पर्यावरण रक्षण, महिला सक्षमीकरणाबरोबरच जग वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा संदेशही देतात. पनवेल ते गोवा सायकल सफरीवर निघालेल्या 'त्या तिघी' साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनीता कुंभकर्ण - वय ४५ वर्ष


वंदना भावसार - वय ५० वर्ष


अजिता बाबुराज - वय ५० वर्ष


वयाची कुठलीही तमा न बाळगता या तिघींनी सुरू केलाय एक नवा प्रवास... पनवेल ते गोवा हे जवळपास ६५० किलोमीटरचं अंतर त्या सायकलनं पार करणार आहेत. २२ ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा प्रवास २९ ऑक्टोबरला गोव्यात संपणार आहे. पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि निरोगी आरोग्य हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या तिघींनी २०१३ पासून सायकलिंगला सुरूवात केलीय.


या तिघींचा हा काही पहिलाच सायकल प्रवास नाही. याआधी पनवेल ते शिर्डी, गोवा ते कन्याकुमारी, मनाली ते कारगील अशी यशस्वी सायकल सफर या तिघींनी केली आहे. या प्रवासादरम्यान वाटेतल्या गावातल्या महिलांशी संवाद साधायचा... त्यांची संस्कृती, प्रश्न समजून घ्यायचे, मिळेल ते खायचं आणि कुठेही राहायचं, असं करत करत त्यांचा प्रवास सुरू असतो.


स्मार्ट सिटीची स्वप्नं पाहताना खरा भारत वेगळाच आहे, तो पहायचा असेल तर खेड्याकडे यायला हवं आणि असा भारत तुम्हाला कारमधून दिसणार नाही... तर त्यासाठी सायकल हे एकमेव सुयोग्य माध्यम आहे. त्यामुळे आपण खेड्यांशी तेथील संस्कृतीशी आणि माणसांशी जोडले जातो, असं या तिघींचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी सायकलवरुन प्रवास सुरू केलाय.


या तिघींची सायकलवरुन पनवेल ते गोवा ही टूर निश्चितच प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा...