लखनऊ : समाजात मुलींवर होणारे अन्याय आणि विनयभंगाच्या अनेक घटना समोर येत आहेत. यासंदर्भात अनेक केसेस न्यायालयात देखील लढल्या जात आहे. परंतु मुलींबरोबर घडणाऱ्या या घटना नक्की का घडतात? कशामुळे घडतायत? यामध्ये नेमकी चूक कोणाची यावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यात काही लोकांचे असे म्हणणे आहे की, या घटना मुलींच्या कपड्यांमुळे किंवा त्यांना जास्त प्रमाणात सुट मिळाल्यामुळे घडत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतू मुलींवर होत असलेल्या या अत्याचारांवर उत्तर प्रदेश महिला आयोग सदस्य मीना कुमारी यांनी एक मोठे वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजवली आहे.


यूपी महिला आयोगाच्या सदस्य मीना कुमारी यांनी अलीगडमध्ये सांगितले की, "महिलांनी मोबाईल वापरल्यामुळे त्यांच्या वरील गुन्हे वाढत आहेत. मीना कुमारी म्हणाल्या की, महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीबाबत समाजने स्वत: गंभीर असायला हवे, तरच या सगळ्या गोष्टींना आळा घालणे शक्य होईल. मोबाईल सध्याची एक मोठी समस्या आहे. मुली तास न तास मोबाईलवर बोलत असतात, मुलांबरोबर उठतात, बसतात आणि फिरतात या सर्व गोष्टींमुळे महिलांच्या विरोधात गुन्हेगारी घटना वाढत आहेत."


त्या पुढे म्हणाल्या की," मुलींचे मोबाईल फोन त्यांच्या घरच्यांकडून तपासले जात नाहीत. त्या कोणाशी बोलत आहे हे घरातील सदस्यांना ठाऊक नसते. मुली मुलांसोबत मोबाईलवर बोलतात आणि मुलांबरोबर पळून जातात." मीना कुमारी यांनी मुलींच्या घरच्यांना आपल्या मुलींना मोबाईल देऊ नये असे आवाहन केले आहे.


जर मुलींना मोबाईल दिला तरीही त्यांच्यावर लक्षं ठेवा असे ही त्या म्हणाल्या. मुलीवर लक्ष ठेवण्याची आईची मोठी जबाबदारी आहे, कारण जर मुलगी बिघडली तर आईच त्याच्यासाठी जबाबदार असणार आहे. असे ही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.


यानंतर या विधानावर सर्वत्र टीका होत आहे. देशभरात महिलांवरील गुन्हेगारीच्या घटना वाढ आहेत. अशा परिस्थितीत महिला आयोगातील सदस्यांच्या अशा वक्तव्याबद्दल लोकांमध्ये संताप आहे. सोशल मीडीयावर लोकं या विधानाबद्दल मीना कुमारीला ट्रोल करत आहेत.