Covid- 19 : १०२ वर्षीय वृद्ध महिलेची कोरोनावर मात
धोकादायक आजारातून सुखरूप वाचणाऱ्यांची देखील संख्या समोर येत आहे.
लंडन : कोरोना व्हायरसमुळे जगात सर्वत्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मृतांचा आकडा देखील मोठा आहे. त्यात कोरोना या धोकादायक आजारातून सुखरूप वाचणाऱ्यांची देखील संख्या समोर येत आहे. नुकताच लंडनमध्ये चक्क १०२ वर्षीय वृद्ध महिलेने कोरोनावर मात केली आहे. ही महिला आता पूर्णपणे बरी झाली आहे. तिला घरी देखील पाठवण्यात आलं आहे. यासंबंधी माहिती लंडनच्या स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
१०२ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. माध्यमांच्या म्हणण्यानुसार या वृद्ध महिलेवर लिव्हरपूलच्या एंट्री रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात कोरोना रुग्णांपैकी ही सर्वात वृद्ध महिला होती. त्यामुळे कोरोना पासून आपण वाचू शकतो. फक्त गरज आहे ती म्हणजे आत्मविश्वासाची.
सांगण्यात येत आहे की, रुग्णालयात ही महिला सर्वांचं मनोरंजन करायची. वार्डमध्ये आता प्रत्येक जण तिला लक्षात ठेवेल. एवढचं नाही तर घरी परतताना तिचं कौतुक देखील करण्यात आलं. दरम्यान, नुकताच एका ६८ वर्षीय महिला आणि २ मेडिकल कर्मचाऱ्यांच कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. कोविड १९ चा फैलाव रोखण्यासाठी लावलेला लॉकडाऊन लवकर काढला गेला तर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.
जगभरात १७ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालीय तर एक लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन लगेच संपवला गेला तर कोरोनाचा झपाट्याने प्रसार होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.