नायजेरियात थरकाप उडवणारी दुर्घटना! लग्नाच्या पाहुण्यांनी भरलेल्या बोटीचे दोन तुकडे; 103 नागरिक ठार
Nigeria Boat Tragedy: नायजेरियात (Nigeria) लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणारी बोट उलटून भीषण दुर्घटना घडली आहे. बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक ठार झाले आहेत. बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक असल्याने ती अक्षरश: दोन भागात दुभागली गेली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
Nigeria Boat Tragedy: नायजेरियात (Nigeria) भीषण दुर्घटना घडली आहे. लग्नातून परतणारी बोट पलटी झाल्याने 103 लोक ठार झाले आहेत. यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक असल्याने ती अक्षरश: दोन भागात दुभागली गेली होती. जवळपास 300 लोक बोटीत होते अशी माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याची राजधानी इलोरिनपासून 160 किलोमीटर (100 मैल) अंतरावर असलेल्या क्वारा राज्यातील पाटेगी जिल्ह्यातील नायजर नदीवर सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. गर्दीने भरलेली बोट पलटी झाल्यानंतर स्थानिक आणि पोलीस बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत 100 लोकांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलीस विभागाचे प्रवक्ता Okasanmi Ajayi यांनी दिली आहे.
स्थानिक प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीत बुडून मृत्यूमुखी पडलेले अनेकजण लग्नासाठी गेले होते. हे सर्वजण वेगवेगळ्या गावातील नातेवाईक होते. रात्री उशिरापर्यंत ते पार्टी करत होते. लग्नासाठी सर्वजण आपापल्या बाईकने आले होते. पण रस्त्यावर पुराचं पाणी आल्याने त्यांना घरी जाण्यासाठी स्थानिक बोटीचा वापर करावा लागला.
बोटीत 300 लोक असल्याने तिच्यावर भार आला होता. बोट पुढे सरकत असतानाच त्याच्यात मोठी भेग पडली आणि ती दोन भागात दुभागली गेली असंही त्यांनी सांगितलं आहे.
शेजारच्या नायजर राज्यातील एग्बोटी गावात हा विवाह पार पडला, असे उस्मान इब्राहिम या रहिवाशाने सांगितलं आहे. पहाटे 3 वाजता ही दुर्घटना डली असल्याने अनेकांना फार उशिरा याबद्दल माहिती मिळाली असंही त्यांनी सांगितलं.
प्रवासी बुडत असताना जवळपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सुरुवातीला सुमारे 50 जणांना वाचवण्यात यश मिळवलं. सुरुवातीला प्रवाशांना वाचवणं फार कठीण जात होतं असं ते म्हणाले आहेत.
मंगळवारी संध्याकाळपर्यंत अधिकारी आणि स्थानिक नदीत मृतदेहांचा शोध घेत होते. नायजेरियातील ही सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. बुधवारी रात्रीपर्यंत बचावकार्य सुरु राहील असं पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान स्थानिकांनी आपण गेल्या अनेक वर्षात इतकी भीषण बोट दुर्घटना पाहिली नसल्याचं म्हटलं आहे.
मंगळवारी संध्याकाळपर्यंत, आतापर्यंत सापडलेले सर्व मृतदेह स्थानिक रीतीरिवाजांनुसार नदीजवळ पुरण्यात आले होते, असे लुकपाडा यांनी सांगितलं आहे.
नायजेरियातील अनेक दुर्गम ठिकाणी बोट दुर्घटना सामान्य आहेत. या ठिकाणी सामान्यतः स्थानिकरित्या बनवलेल्या बोटींचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. बहुतेक अपघात हे जास्त गर्दी आणि योग्य देखभाल न केल्याने होतो.