नवी दिल्ली : श्रीलंकेत झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटानंतर स्थानिक सुरक्षा दलानं दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केलीय. श्रीलंकेत सुरक्षादलानं 'इस्लामिक स्टेट' या दहशतवादी संघटनेच्या अनेक ठिकाणांवर छापे घातलेत. न्यूज एजन्सी 'रॉयटर्स'नं दिलेल्या माहितीनुसार, यावेळी दोन्ही बाजुंकडून करण्यात आलेल्या गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झालाय. लपून बसलेल्या इस्लामिक स्टेटच्या तीन दहशतवाद्यांचा मृतांत समावेश आहे. तसंच या कारवाईत सहा लहान मुलांचाही मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेत गेल्या सोमवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सहा दिवसांनी सेनेच्या एका अधिकाऱ्यानं शनिवारी ही माहिती दिलीय. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी अमपाराच्या संथामारुथूमध्ये हा गोळीबार झाला.


श्रीलंकेच्या सुरक्षा दलानं देशातील पूर्व भागात लपून बसलेल्या इस्लामिक स्टेट या संघनटनेशी निगडीत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर छापे घातले. यावेळी त्यांच्यासोबत झालेल्या गोळीबारात दलानं दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. सेनेचे प्रवक्ते सुमित अटापट्टू यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षादलानं जेव्हा कलमुनई शहरात बंदुकधारकांच्या ठिकाणांत घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. सावध सेनेनं उत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. 



ईस्टरच्या दिवशीच झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात या तिघांचा हात असल्याचं समजलं जातंय. पोलीस प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, कोलंबोहून ३२५ किलोमीटर दूर सम्मनतुरई शहरात ही गोळीबाराची घटना घडली. यावेळी, ठिकाणाहून स्फोटकांचा साठा, एक ड्रोन आणि इस्लामिक स्टेटचा एक बॅनरही जप्त करण्यात आलाय.