तिबेटमध्ये 22000 फूट उंचीवर आढळले 15 हजार वर्षे जुने 33 भयानक व्हायरस; भारतासह अनेक देशांना मोठा धोका
Tibet : जगभरात अनेक ठिकाणी पर्माफ्रॉस्ट अर्थात गोठलेला बर्फ वितळत आहे. या पर्माफ्रॉस्टखाली प्राचीन जीव, विषाणू, जीवाणू दबलेले आहेत. बर्फ वितळू लागल्याने हे विषाणू आता बाहरे पडू लागले आहेत.
Melting Tibetan Glaciers: तिबेटमध्ये (Tibet) हिमनद्या अर्थात ग्लेशियर प्रचंड वेगाने वितळत असल्याचे चिंता वाढली आहे. अशातच आता तिबेटमध्ये 22000 फूट उंचीवर 33 भयानक व्हायरस आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे व्हायरस हजारो वर्षांपासून बर्फाखाली गाडले गेले होते जे आता बाहेर पडत आहेत. भारतासह अनेक देशांना व्हायरसचा मोठा धोका आहे.
संपूर्ण जगावर ग्लोबल वार्मिंगचे संकट घोंगावत आहे. अशातच तिबेटमध्ये अनेक हिमनद्या वेगाने वितळत आहेत. तिबेटमध्ये 15 हजार वर्षे जुने व्हायरस सापडले आहेत. हे व्हायरस भारत, चीन आणि म्यानमारसारख्या देशांसाठी धोकादायक ठरू शकतात अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. या अती प्राचीन व्हायरसचा फैलाव झाल्यास परिस्थिती आटोक्यात आणणे अशक्य आहे.
हिमनद्या आणि पर्माफ्रॉस्ट वितळल्याने 40 हजार वर्षे जुने महाकाय प्राणी, 7.50 लाख वर्षे जुने जीवाणू पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे सर्व विषाणू पुन्हा जिवंत झाल्याने 10 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन गायब झालेला वूली मॅमथ हा प्राणी पुन्हा जिवंत होणार आहे. आर्क्टिक पर्माफ्रॉस्टमध्ये वूली मॅमथ या प्राण्याचे अवशेष सापडले आहेत.
22000 फूट उंचीवर आढळले भयानकर व्हायरस
तिबेटच्या पठारावर असलेल्या गुलिया आइस कॅपजवळ शास्त्रज्ञांना 15 हजार वर्षे जुना विषाणू सापडला आहे. अनेक प्रजातींचे हे विषाणू आहेत. हे विषाणू मानवांसाठी धोका निर्माण करू शकतात अशी भिती ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट झी-पिंग झोंग यांनी व्यक्त केली आहे. हे विषाणू चीनमधील तिबेटच्या वितळणाऱ्या हिमनदीखाली समुद्रसपाटीपासून सुमारे 22 हजार फूट उंचीवर आढळले आहेत. शास्त्रज्ञांना 33 विषाणू सापडले आहेत. यापैकी 28 व्हायरस यापूर्वी कधीच पाहिले नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हे व्हायरस प्रत्येक ऋतूत जिवंत राहू शकतात. अती थंड किंवा अती उष्ण असा कोणत्याही प्रकारच्या तापमानाचा या विषाणूवर काहीच परिणाम होत नाही. यामुळे या व्हायरसचा फैलाव होवून त्याचा संसर्ग झाल्यास तो आटोक्यात आणणे अशक्य होईल अशी चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
भारतासह अनेक देशांच्या नद्यांमध्ये सापडले व्हायरस
गेल्या वर्षीच तिबेटच्या हिमनद्यांमध्ये जीवाणूंच्या 1000 नवीन प्रजाती आढळल्या होत्या. या हिमनद्यांचे पाणी बॅक्टेरियासह चीन आणि भारताच्या नद्यांमध्ये मिसळल्यास पिण्याच्या पाण्यातून आजारांची लागण होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी तिबेटच्या पठारावर असलेल्या 21 हिमनद्यांचे नमुने गोळा केले होते. सन 2016 ते 2020 दरम्यान हे नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये जिवाणूंच्या 968 प्रजाती संशोधकांना आढळल्या होत्या. यापैकी 82% जीवाणू पूर्णपणे नवीन असल्याचे संशोधकांकडून सांगण्यात आले होते.