ब्युरो रिपोर्ट :  जगभरात ३८ लाख ५० हजारांवर लोकांना कोरोनाची लागण झाली असून २ लाख ६६ हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या अमेरिकेत कोरोना बळींची संख्या ७५ हजारांच्या जवळ पोहचली असून कोरोनाची साथ आल्यापासून अमेरिकेत बेरोजगार झालेल्यांची संख्या ३ कोटी ३० लाखांपर्यंत पोहचली आहे. यावरून कोरोनाचे संकट किती भयावह आहे हे लक्षात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची सर्वाधिक झळ अमेरिकेला बसली आहे. त्यानंतर ब्रिटनमध्ये कोरोनाचे ३० हजारावर बळी गेले आहेत. इटलीमध्ये २९ हजार ६८४ मृत्युमुखी पडले आहेत. तर स्पेनमध्ये २६ हजारावर बळी गेले आहेत. फ्रान्समध्ये २५ हजार ८०० हून अधिक बळी गेले आहेत. हे पाच देश असे आहेत ज्या देशांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.


यानंतर ५ हजारांहून अधिक बळी गेलेल्या देशांमध्ये बेल्जियममध्ये ८ हजार ४०० हून अधिक बळी गेले आहेत. तर ब्राझिलमध्ये ८ हजार ६०० हून अधिक मृत्युमुखी पडले आहेत. जर्मनीमध्ये ७ हजार २७७ तर इराणमध्ये ६ हजार ४८६ बळी गेले आहेत. चीनमध्ये ४ हजार ६३३ बळी गेले आहेत, तर कॅनडामध्ये ४२८० बळी गेले आहेत.


जगभरात बुधवारी एकाच दिवशी ९५ हजारावर लोकांना कोरोनाची लागण झाली, तर ६ हजार ८०० हून अधिक लोकांचा बळी गेला.  


 



अमेरिकेत सात आठवड्यात ३ कोटी ३० लाख लोकांनी बेरोजगार भत्यासाठी अर्ज केला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील बेरोजगारी ३० लाखांनी वाढली आहे. दर आठवड्याला अमेरिकेतील बेकारांच्या संख्येत वाढ होत आहे आणि ही या देशातली आजवरची सर्वाधिक बेरोजगारी आहे.