आई-वडिलांची घरातच आत्महत्या, दोन चिमुरड्यांची हृदयद्रावक कहाणी
अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीनं आपल्या दोन महिन्यांच्या भावाला घट्ट धरून ठेवलेला हा फोटो व्हायरल न झाला तरच नवल...
नवी दिल्ली : भावा-बहिणीचं नातं थोडं खोडकर आणि खूप जास्त प्रेमळ असलेलं आपणही अनुभवलेलं असेल... पण, या दोन मुलांची कहाणी मात्र तुमच्या डोळ्यांत अश्रू उभे करू शकते. शिकागोमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक अशी घटना समोर आलीय. मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आपल्याच घरातून या दोन मुलांना शेजाऱ्यांनी सोडवलं होतं. मोठी मुलगी चार वर्षांची आहे तर तिचा लहान भाऊ अवघ्या दोन महिन्यांचा... यावेळी या चिमुरड्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह पोलिसांना घरात सापडले. पोलिसांनी या चिमुरड्यांना ताब्यात घेतल्यानंतर तब्बल तीन दिवस ही दोन्ही मुलं आपल्याच घरात कोंडलेल्या अवस्थेत असून तीन दिवस ते उपाशीच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
फोटो व्हायरल
सोशल मीडियात या मुलीचा आणि तिच्या भावाचा फोटो खूपच व्हायरल होतोय. अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीनं दोन महिन्यांच्या भावाला आपल्या कुशीत धरलं होतं... तब्बल तीन दिवस तिनंच आपल्या भावाला सांभाळलं. आपले आई - वडील या जगात नाहीत याची या दोन्ही निरागस चिमुरड्यांना साधी कल्पनाही नव्हती.
आई-वडिलांचा मृतदेह घरातच
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी लॉस एन्जेलिसच्या एका घरात शेजाऱ्यांना काही संशयास्पद वाटलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांसोबत या घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना ही दोन्ही मुलं आढळली होती... तर त्यांच्या आई-वडिलांचा मृतदेह घरातच पडलेले होते. चौकशीत या मुलांच्या वडिलांनी आईची हत्या केली होती आणि त्यानंतर आत्महत्या करत स्वत:च जीवन संपवलं होतं.
आई-वडिलांबद्दल चिमुरडी म्हणते...
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांनी या दोन्ही चिमुरड्यांकडे त्यांच्या आई-वडिलांची चौकशी केली तेव्हा अत्यंत निरागसपणे मुलीनं उत्तर दिलं 'ते दोघेही झोपले आहेत'... तसंच गेल्या तीन दिवसांपासून आपण आणि भावानं काहीही खाल्लं नसल्याचंही या मुलीनं पोलिसांना सांगितलं. ही दृश्यं पाहून पोलिसही हादरलेच... पोलिसांनी या दोन्ही चिमुरड्यांना ताब्यात घेऊन सध्या त्यांची जबाबदारी Department of Children and Family Services कडे सोपवलीय.
सोशल मीडियावरून भरभरून प्रेम
अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीनं आपल्या दोन महिन्यांच्या भावाला घट्ट धरून ठेवलेला हा फोटो काही वेळातच त्यांच्या कहाणीसह व्हायरल न झाला तरच नवल... जगभरातून या चिमुरड्यांवर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.