450000 Owls To Be Killed: अमेरिकेतील वन अधिकारी साडेचार लाख घुबडांना संपवण्याचा प्लॅन तयार करत आहेत. यासंदर्भातील नियोजन सध्या सुरु असून एवढ्या मोठ्या प्रमाणात घुबडांना का मारलं जाणार आहे असा प्रश्न तुम्हालीही पडला असेल तर यामागील कारण फारच रंजक आहे. अमेरिकेतील वेस्ट कोस्टच्या जंगलांमध्ये वनविभागाकडून शिकाऱ्यांना तैनात केलं जाणार आहे. हे शिकारी ठराविक प्रजातीच्या घुबडांची शिकार करणार आहे. काही शे किंवा हजार नाही तर तब्बल 4 लाख 50 हजार घुबडांची शिकार या शिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. आता हे असं का? असा प्रश्न पडला असेल तर हा निर्णय नामशेष होत आलेल्या घुबडांच्या अन्य प्रजातीला वाचवण्यासाठी घेण्यात आला आहे. स्पॉटेड आऊल म्हणजेच अंगावर ठिपके असलेल्या घुबडांची संख्या कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 


शिकारी तैनात करुन साडेचार लाख घुबडं मारणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मत्स्य आणि वन्यजीव सेवा विभागाने बुधवारी एक नवा आदेश जारी केला आहे. ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया या राज्यांमधील ठिपकेदार घुबडांची संख्या वाढवण्याचा वन्यजीव सेवा विभागाचा मानस असल्याचं वृत्त असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. वन्यजीव सेवा विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांनुसार जास्तीत जास्त 4 लाख 50 हजार पट्टेरी घुबडं मारली जाणार आहेत. या घुबड्यांनी मागील तीन दशकांमध्ये अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशातून पश्चिम किनारपट्टीवरील जंगली भागांमध्ये स्थलांतर केलं आहे. पट्टेरी घुबडांनी केलेल्या स्थलांतरणामुळे आता नॉर्दन स्पॉटेड आऊल्स आणि कॅलिफॉर्निया स्पॉटेड आऊल्स या दोन प्रजातींचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. आपल्या प्रदेशात घुसखोरी करणाऱ्या या स्थलांतरित घुबडांच्या प्रजातीसमोर ही छोट्या आकाराची ठिपकेदार घुबडं फारसा तग धरु शकत नाही. त्यामुळेच या घुबडांची संख्या झापट्याने कमी होत आहे. या स्थलांतरित घुबडांना राहण्यासाठी कमी जागा लागत असल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे.


यापूर्वीही झाले अनेक प्रयत्न


यापूर्वीही स्पॉटेड आऊल्सला वाचवण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. यामध्ये या घुबडांचं वास्तव्य असलेल्या जंगलांचं संरक्षण करणं, यासंदर्भात जनजागृती करणं यासारखे उपक्रम राबवले गेले आहेत. येथील स्थानिक अधिकारी मागील अनेक वर्षांपासून तिन्ही प्रजातींच्या घुबडांची संख्या संतुलित राहण्यासाठी प्रयत्न करत असले तरी त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश आलेलं दिसत नाही.


...तर दोन प्रजाती नामशेष होतील


एकीकडे स्थलांतरित पट्टेरी घुबडांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे आकाराने लहान आणि फारशी शक्तीशाली नसलेल्या ठिपकेदार घुबडांची संख्या तितक्याच वेगाने कमी होत आहे. आता तर अशी स्थिती आहे की ठिपकेदार घुबडांच्या या दोन्ही प्रजाती नामशेष होऊ शकतात. "पट्टेरी घुबडांच्या संख्येवर नियंत्रण मिळवलं नाही तर इतर दोन प्रजातीची घुबडं नामशेष होतील. मागील अनेक दशकांपासून प्रयत्न सुरु असले तरी त्याला यश येत नसल्याने हा निर्णय़ घ्यावा लागत आहे," असं मत्स्य आणि वन्यजीव सेवा विभागाचे निरिक्षक केसिना ली यांनी सांगितलं आहे. 


प्रश्न सुटणार नाही, उगाच घुबडं मारली जातील


मात्र एका प्रजातीला वाचवण्यासाठी अन्य प्रजातीच्या पक्षांचा एवढ्या मोठ्याप्रमाणात संहार करायचा प्लॅन अनेकांना पटलेला नाही. अशाप्रकारे वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी असलेला विभागच प्राण्यांची शिकार करणार असेल तर त्याला काय अर्थ आहे? असा प्रश्न प्राणीप्रेमींनी विचारला आहे. स्थलांतर करणाऱ्या घुबडांची संख्या नियंत्रण राहण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी असा संहार केल्याने काहीही साध्य होणार नसून समस्या आहे तशीच राहील आणि कारण नसताना साडेचार लाख घुबडं मारली जातील अशी भितीही प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.