लिबियामध्ये जहाज तुटले ; ९० लोक बेपत्ता
लिबियामध्ये एक जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेत आठ प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे तर साधारणपणे ९० लोक बेपत्ता आहेत.
त्रिपोली : लिबियामध्ये एक जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेत आठ प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे तर साधारणपणे ९० लोक बेपत्ता आहेत. लिबिया नौसेनेने दिलेल्या माहितीनुसार त्रिपोलीच्या पश्चिम शहरात साब्राथा तटजवळ ही दुर्घटना घडली. युरोपला जाण्यासाठी हा मार्ग वापरला जातो.
जहाजवरून सुमारे १०० लोक प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक जहाज तुटले. या दुर्घटनेत सात लोकांना वाचवण्यात बचाव दलाला यश आले आहे, बाकी लोक बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य चालू आहे.
यापूर्वी झालेल्या दुर्घटनेत लीबिया कोस्टगार्डने युरोपकडे जाणाऱ्या ३ हजार प्रवाशांना वाचवले होते. तर २ हजार लोकांना वाचवण्यात इटलीला यश आले होते.
मे मध्ये भूमध्य समुद्रात ५०० प्रवासी असलेले एक जहाज उलटले. या दुर्घटनेत २०० लोक बुडाले तर सुमारे ३४ लोकांचा मृत्यू झाला.
आफ्रिकन देशातून भूमध्य समुद्र ओलांडून युरोपला जाणाऱ्या जलवाहतुकीसाठी लीबिया हे केंद्र आहे. युरोपीय संघ आणि तुर्की यांच्यात झालेल्या करारानंतर ग्रीसच्या मार्गाने होणारी वाहतूक बंद केली. त्यामुळे अधिकतर वाहतूक भूमध्य समुद्रातूनच होते. आंतरराष्ट्रीय संघटनेनुसार या वर्षी भूमध्य समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीत ५५९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी ही संख्या ५००० इतकी होती.