आज्जीबाई जोरात ! ९१ व्या वर्षी झाल्या ग्रॅज्युएट
माणसाने आयुष्यभर शिकत राहाव अस म्हणतात पण सर्वांनाच ते काही शक्य होत नाही. मग ते शैक्षणिक अभ्यासक्रम असो किंवा कोणतेही क्षेत्र. शिकण्याच्या अनेक संधी रोज निर्माण होत राहतात. जोड हवी ती मेहनत, जिद्द आणि चिकाटीची. थोडीशी जबाबदारी वाढली की माणस शैक्षणिक अभ्यासक्रम बाजुला ठेवतात. पण ९१ वर्षांच्या आज्जीबाईने एका नवा आदर्श निर्माण केला आहे. या आजीने केलेली कामगिरी ऐकू तरुण मुल-मुलीही आश्चर्य व्यक्त करतील.
तर ही गोष्ट आहे थायलंडमधल्या ९१ वर्षांच्या आजीची. नातवंड-पतवंडांसोबत खेळण्याच्या वयातही ती अभ्यास करत राहीली हे खरचं खूप कौतुकास्पद आहे. आपण काहीतरी शिकलोय हे मनाला पटत नाही तोपर्यंत त्या शिकत राहील्या. गेल्या दहावर्षांपासून अभ्यासात लक्ष केंद्रीत करत असेलल्या आज्जीबाईंच्या मेहनतीला फळ मिळाले आहे. नुकतीच या आजींनी महाविद्यालयातून पदवी संपादन केली. किमलान जिनाकू असं या आजींचं नाव. त्यांनी मानव आणि कुटुंब विकास या विषयात त्यांनी पदवी संपादन केली. त्यामुळे आज्जी ही सर्वांसाठी आदर्श म्हणून उभी राहीली आहे.
आपण शिकलोच नाही तर वाचणार कसं, आपल्याला ज्ञान कसं मिळणार आणि जर आपल्याजवळ ज्ञानच नसेल तर चारचौघांत आपण नीट बोलणार कसं’ असं या आजी म्हणतात. यावरुन त्यांची शिक्षणाविषयीची कळकळ दिसून येते.
थायलॅंडच्या राज्याच्याहस्ते पदवी
मानव आणि कुटुंब विकास या विषयाचा अभ्यास करण्यासाठी दहा वर्षे मेहनत घेतली. नुकताच त्यांच्या दीक्षांत सोहळा पार पडला यावेळी थायलँडच्या राजांच्या हस्ते त्यांना पदवी प्रदान करण्यात आली. वयाच्या ९१व्या वर्षी पदवी संपादन करून आजींनी एक नवा आदर्श जगासमोर घालून दिला आहे.