`या` तरुणीला हवाय प्रियकर, फक्त एक फॉर्म भरुन पाठवा; आतापर्यंत 3 हजार तरुणांचे अर्ज
एका तरुणीने प्रियकराच्या शोधात असं काही केलं ज्याची सध्या जगभरात चर्चा रंगली आहे. लंडनमधील या तरुणीने प्रियकर शोधण्यासाठी चक्क अर्जच काढला आहे. यासाठी उमेदवारांना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत.
नोकरी किंवा लग्नासाठी एखाद्याने जाहिरात दिल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण प्रियकर शोधण्यासाठी एखाद्या तरुणीने जाहिरात दिल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? पण एका मुलीने खरंच अशी जाहिरात दिली असून, संपूर्ण जगभरात याची चर्चा रंगली आहे. तरुणीने प्रियकराच्या शोधात चक्क फॉर्मच काढला आहे. टिकटॉकवर @itsveradijkmans नावाच्या आयडीवरुन वेरा नावाच्या एका मुलीने हा फॉर्म जारी केला आहे. तिचे टिकटॉकवर तब्बल 3 लाख 74 हजार फॉलोअर्स आहेत. याच अकाऊंटवर तिने हा अर्ज टाकला आहे.
'आई-वडिलांसह राहताय का? कार आहे का?'
टिकटॉकच्या या व्हिडीओत वेराने आपल्या अर्जात दिलेल्या काही प्रश्नांवर चर्चा केली आहे. यामध्ये तुम्ही आपल्या आई-वडिलांसह राहता का? तुमच्याकडे कार आहे का? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. लंडनमध्ये राहणाऱ्या वेराने म्हटलं आहे की, 'काही लोकांना मी प्रेम शोधण्यासाठी अर्ज जारी केला आहे हे पाहून आश्चर्य वाटत आहे. पण एकूणच मला यासाठी फार सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे'.
एका दिवसात 3000 अर्ज
2023 मध्ये डेटिंग करणं कठीण आहे. त्यामुळे मला कोण चांगला उमेदवार आहे, ज्याच्यासह माझी जोडी जमेल हे जाणून घेण्याची इच्छा आहे. मी जाहिरात दिल्यानंतर मला प्रेमाचे इतके संदेश आले आहेत, जे मोजणंही कठीण आहे. माझ्याकडे फक्त 24 तासांत जवळपास 3000 अर्ज आले आहेत असा दावा तरुणीने केला आहे.
'दर्जा हवा, त्याच्याशी तडजोड नाही'
तरुणीने मी अद्यापही इतर अर्जांची वाट पाहत असल्याचं सांगितलं असून, दर्जा हवा त्याच्याशी तडजोड करणार नसल्याचं म्हटलं आहे. प्रेम फार लवकर मिळत नाही असंही ती म्हणाली आहे. वेराचं म्हणणं आहे की, "मी आयुष्यभर एकटी राहिली आहे. यासाठी मी आता एका प्रियकरासाठी तयार आहे. मी संसार थाटण्यासाठी आणि गांभीर्याने तो करण्यासाठी पूर्पपणे तयार आहे".
"त्याला कार्टूनची आवड हवी"
वेराने अर्जात दिलेल्या अटींनुसार, तरुण खेळकर स्वभावाचा असला पाहिजे. त्याच्या संगीताची निवडही चांगली हवी. तो स्वत: कमावता असला पाहिजे. प्रेमात फसवणूक करणारा नसावा आणि त्याला कार्टूनची आवड हवी.
वेराच्या अर्जाला उत्तर देणाऱ्यांमधील एका तरुणाने म्हटलं आहे की, मी आई-वडिलांसोबत राहतो. माझ्याकडे गाडी नाही, पण दोन बोटी आहेत.
डेटवर गेल्यास बिल कोण भरणार?
एकाने म्हटलं आहे की, मला कार्टून आवडत नाही, पण तो कधीही फसवणूक करणार नाही. दरम्यान, वेराने आपल्या पहिल्या डेटवर काय अपेक्षा आहेत हेदेखील सांगितलं आहे. यामध्ये बिल कोण भरणार याचाही उल्लेख आहे. तिने लिहिलं आहे की, ''मी नटून थटून येईल. कारण मला त्या व्यक्तीवर आपली छाप पाडायची आहे. यासह मी ज्याला डेट करत आहे, त्याच्याकडूनही अशीच अपेक्षा करेन. तसंच जर मला वाटलं तर मी त्याच्याबद्दल मतही व्यक्त करेन, मी माझं बिल भरेन".