प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची आकाशातच धडक; अमेरिकेत भीषण दुर्घटना, 18 मृतदेह नदीतून बाहेर काढले

अमेरिकेत भीषण विमान दुर्घटना घडली आहे. 60 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची आकाशातच धडक झाली आहे. यानंतर बचावकार्य सुरु असून, नदीतून 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या रीगन नॅशनल विमानतळाजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. 60 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची आकाशातच धडक झाली आहे. यानंतर हे विमान आणि हेलिकॉप्टर नदीत जाऊन कोसळलं. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत 18 मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. विमानात एकूण 64 जण प्रवास करत होते. तर लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये तिघे होते.
अमेरिकेत विमान दुर्घटनेनंतर प्रवासी आणि बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण आहे. याचं कारण ज्या नदीत विमान कोसळलं आहे त्याचं पाणी फार थंड आहे. या नदीत एखादी व्यक्ती काही मिनिटं जरी बुडाली तरी गोठून जाते.
कोणत्या नदीत कोसळलं विमान
दुर्घटनेनंतर विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत पडले. ही युनायटेड स्टेट्सच्या मध्य-अटलांटिक प्रदेशातील एक प्रमुख नदी आहे. हे वेस्ट व्हर्जिनियामधील पोटोमॅक हायलँड्सपासून मेरीलँडमधील चेसापीक खाडीपर्यंत वाहते. पोटोमॅक नदी 405 मैल लांब आहे. ही अमेरिकेतील 21 वी सर्वात मोठी नदी आहे. त्याच्या पाणलोट क्षेत्रात 50 लाखांहून अधिक लोक राहतात. या नदीत जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे कारण नदीचे तापमान इतके कमी आहे की पोहूनही पाण्यातून बाहेर पडता येत नाही.
कशी झाली दुर्घटना
प्रवासी विमान विमानतळावर लँड करत असताना ही दुर्घटना घडली. त्याचवेळी मागून येत असलेल्या अमेरिकी लष्कराच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरशी त्याची धडक झाली. धडकेनंतर दोन्ही क्रॅश होऊन पोटोमॅक नदीत कोसळले. विमानाची ज्या हेलिकॉप्टरशी धडक झाली ते Sirosky H-60 हेलिकॉप्टर होत. रिपोर्टनुसार, हे एक छोटं प्रवासी विमान होतं, ज्यामध्ये 65 प्रवाशांच्या बसण्याची क्षमता आहे. हे विमान कंसास येथून वॉशिंग्टनला निघालं होतं.
विमान कंपनीने काय सांगितलं आहे?
एअरलाइन कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, आम्हाला बातमी मिळाली आहे की PSA द्वारे संचालित अमेरिकन ईगल फ्लाइट 5342 कॅन्ससहून वॉशिंग्टन रीगन राष्ट्रीय विमानतळावर येत होतं. ते क्रॅश झालं आहे. याआधी अमेरिकेचे सिनेटर टेड क्रुझ यांनी सांगितले की, या दुर्घटनेत मृत्यु झाले आहेत पण विमानात किती लोक होते हे अद्याप आम्हाला माहीत नाही. दरम्यान, विमानतळावरील विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कॅन्ससचे सिनेटर रॉजर मार्शल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'जेव्हा एकाचा मृत्यू होतो, ही शोकांतिका असते, परंतु जेव्हा अनेक लोक मरतात तेव्हा ते असह्य दु:ख असते".