दुकानदार म्हणाला `तुला परवडणार नाही`, तरुणाने खरेदी केलं अख्खं दुकान अन् त्यानंतर...; VIDEO व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) चीनमधील (China) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये एक तरुण विक्रेत्याने अपमान केल्यानंतर त्याच्याकडील नूडल्सची सर्व पाकिटं खरेदी करुन ती रस्त्यावर फेकून देत असल्याचं दिसत आहे. तरुणाने 120 डॉलर्स देत त्याच्याकडील सर्व पाकिटं खरेदी केली होती.
Viral Video: अपमान पचवणं तसं कोणालीही कठीणच असतं. महात्मा गांधींनी आपल्याला अहिंसेची शिकवण देत जर कोणी कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा असं सांगितलं आहे. पण खऱ्या आयुष्यात या शिकवणीचा अवलंब करणं अनेकांना कठीण जातं. मग यातूनच अनेकदा हातातून काही अघटित गोष्टी घडतात, ज्यावर नंतर पश्चातापाची वेळ येते. पण काहीजण या अपमानाचा बदला घेण्यासाठी काय करु शकतात हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर नेटकरी वेगवेगळी मतं मांडत आहेत.
हा व्हिडीओ चीनमधील असून, त्यावरुन सोशल मीडियावर चर्चासत्र रंगलं असून त्याने योग्य केलं की अयोग्य यावर मत मांडलं जात आहे. याचं कारण विक्रेत्याने अपमान केल्यानंतर तरुणाने प्रतिक्रिया देताना असं काही केलं की, काही लोकांना ते अजिबात आवडलेलं नाही. विक्रेत्याने तरुणाला तुला परडवणार नाही असं सांगितलं असता, त्याने त्याच्याकडील नूडल्सची सर्व पाकिटं खरेदी करुन ती रस्त्यावर फेकून दिली. तरुणाने 120 डॉलर्स म्हणजेज 9920 रुपयेत देत त्याच्याकडील सर्व पाकिटं खरेदी केली होती.
South China Morning Post (SCMP) ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिडीओतील तरुणाची ओळख पटलेली नाही. दरम्यान रात्री तो मार्केटमध्ये गेला होता. त्याने विक्रेत्याला एक प्लेट इंस्टंट नूडल्ससाठी 14 युआन म्हणजे 164 रुपये खूप महाग असल्याचं सांगितलं. विक्रेत्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही त्याला पटलं नाही. त्याने यात कोणतं साहित्य वापरलं अशी आहे अशी विचारणा केली. त्यावर नूडल्स विक्रेत्याने एक अंड आणि दोन भाज्यांची पानं वापरली असल्याची माहिती दिली.
"पण तुम्ही एकासाठी 14 युआन कसे काय आकारु शकता? हे फार महाग आहे, नाही का?," अशी विचारणा तरुणाने केली. पण विक्रेत्याने त्याला उत्तर देण्यास नकार दिला आणि बाजूला होण्यास सांगितलं. पण यानंतरही तरुण इतक्या महागड्या दराचं कारण काय अशी विचारणा करत राहिला.
यानंतर विक्रेत्याचा मुलगा उभा राहिला आणि त्याच्यावर संतापला. "जर तुला परवडत नसेल तर येथून निघून जा," अशा शब्दांत त्याने त्याला सुनावलं. दरम्यान या अपमानामुळे ग्राहक संतापला. त्याने नूडल्सच्या पॅकेटची किंमत विचारली आणि आपण सगळे खरेदी करत असल्याचं सांगितलं.
यानंतर त्याने नूडल्सची सर्व पाकिटं खरेदी केली. यासाठी त्याने 850 युआन (120 डॉलर्स किंवा 9920) रुपये मोजले. इतकंच नाही तर त्याने ही पाकिटं खाली रस्त्यावर फेकून दिली आणि आपला सगळा संताप व्यक्त केला. तिथे उपस्थित एका व्यक्तीने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तरुणाने दिलेली प्रतिक्रिया योग्य की अयोग्य अशी चर्चा चीनमधील सोशल मीडियावर रंगली असून, अनेकांना त्याला सुनावलं आहे. 'तो तुला ओरडला आणि तू त्याला 850 युआन देत मदत केलीस, तू बरा आहेसस ना?' अशी विचारणा एकाने केली आहे. तर एकाने 'हा तरुणपणाचा अविवेक आहे', अशी कमेंट केली आहे.