30 वर्षं समुद्रात तरंगत होती बाटली, आतमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत दडलं होतं एक गुपित, वाचल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित
एडम ट्रॅव्हिस यांना न्यूयॉर्कच्या पोंक्वॉग येथील शिनेकॉक खाडीमध्ये ही बाटली आढळली. या बाटलीत एक पत्र सापडलं होतं. हे पत्र दोन शाळकरी मुलांनी लिहिलं होतं. यामध्ये एक खास संदेश लिहिण्यात आला होता.
समुद्रकिनारी अनेकदा अशा काही गोष्टी सापडतात ज्या आश्चर्यचकित करतात. यामधील काही गोष्टी या एके दिवशी कोणाला तरी सापडतील अशा अपेक्षेने समुद्रात फेकलेल्या असतात. नुकतंच एका व्यक्तीला न्यूयॉर्कमधील शिन्नेकॉकमधील समुद्रकिनारी असंच काही सापडलं. या व्यक्तीला एक काचेची बाटली सापडली. या बाटलीत एक चिठ्ठी ठेवण्यात आली होती.
ही बाटली समुद्रात कधीपासून होती असा विचार तुमच्याही डोक्यात आला असेल. तर ही बाटली समुद्रात जवळपास 30 वर्षांपासून तरंगत होती. 30 वर्षांपूर्वी कोणीतरी बाटलीमध्ये चिठ्ठी टाकून ती समुद्रात फेकून दिली होती.
या बाटलीमधील संदेश वाचल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले. याचं कारण दोन लहान मुलांनी समुद्रात ही बाटली फेकून दिली होती, जी 30 वर्षांनी वाहून समुद्रकिनारी आली होती.
गुरुवारी (1 फेब्रुवारी) समुद्रात आलेल्या वादळानंतर एडम ट्रॅव्हिस यांना न्यूयॉर्कच्या पोंक्वॉग येथील शिनेकॉक खाडीमध्ये ही बाटली सापडली. या बाटलीत एक पत्र होतं ज्यामध्ये लिहिण्यात आलं होतं की, 'डिअर फाइंडर, 9 वीच्या वर्गातील अर्थ सायन्स प्रोजेक्टचा भाग म्हणून या बाटलीला लाँग आयलँडजवळील अटलांटिक महासागरात फेकून देण्यात आलं होतं. कृपाय खाली दिलेली माहिती भरा आणि ही बाटली आम्हाला परत करा. धन्यवाद शॉन आणि बेन'.
या चिठ्ठीच्या खाली शॉन आणि बेन ही दोन नावं लिहिण्यात आली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी एडम ट्रॅव्हिस यांनी Mattituck High School Alumni च्या फेसबुक पेजवर चिठ्ठी शेअर केली. या पोस्टवर 5000 पेक्षाही जास्त लाईक्स आले. अनेक विद्यार्थ्यांनी आपले माजी शिक्षक रिचर्ड ब्रूक्स यांची आठवण काढली. त्यांनी 1992 मध्ये हा प्रोजेक्ट सुरु केला होता.
त्यांनी लिहिलं आहे की, ब्रुक्स एक चांगले शिक्षक होते. किती चांगला प्रोजेक्ट होता तो. ही आता 32 वर्षं जुनी गोष्ट आहे यावर विश्वासच बसत नाही. ज्यांना ही बाटली मिळाली आहे त्यांना मला भेटायचं आहे. पण या पोस्टवर शॉन आण बेन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दुसरीकडे रिचर्ड यांचा मुलगा जॉन ब्रूक्सने पोस्टवर व्यक्त होताना म्हटलं आहे की, देवा, माझ्या डोळ्यात अश्रू असून, मी भावूक झालो आहे. वडिलांना विद्यार्थ्यांसह असे प्रोजेक्ट करायला आवडत असे. पोस्ट करण्यासाठी आपले आभार. दरम्यान त्याने वडिलांचं काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याचंही त्याने सांगितलं आहे.