...म्हणून बॉम्बचा आवाज होताच ती चिमुकली खळखळून हसते
वडिलांनी तिला शिकवलीये ही कल्पना....
मुंबई : वडीलांचं त्यांच्या मुलीशी असणारं नातं व्यक्त करायचं असल्यास 'जगात भारी' हेच शब्द पुरेसे पडतात. अशा या 'जगात भारी' नात्याचा एक वेगळा आणि जागतिक स्तरावरचा पैलू काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. पण, हा पैलू सुखावह नसून, मनाला हादरा देणारा ठरत आहे. मनात असंख्य प्रश्नांचा काहूर माजवत आहे.
नेटकऱ्यांच्या काळजाचं पाणी करणारा हा व्हिडिओ आहे एका Syrian man सीरियन व्यक्तीचा आणि त्याच्या मुलीचा. ज्यांनी अतिशय तणावाच्या, युद्धजन्य परिस्थितीमध्येही एक असं साधन शोधलं आहे ज्यामुळे किमान सध्यातरी ती चिमुरडी दाहकतेच्या झळांपासून दूर आहे. आपली चिमुकली बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्रांचा मारा यांच्यामुळे होणाऱ्या आवाजामुळे घाबरुन जाऊ नये यासाठी या व्यक्तीने त्याच्या मुलीला एक अनोखा खेळ शिकवला आहे.
एका पत्रकाराने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सीरियातील इदलीबमधील ४ वर्षीय सेल्वा आणि तिचे वडील अब्दुल्ला दिसत आहेत. वडिलांनी शिकवल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा बॉम्ब पडल्याचा प्रचंड आवाज होतो तेव्हा घाबरुन न जाता जणू काही हा एका खेळाचाच भाग असल्याचं समजून ती मुलगी खळखळून हसते.
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
वडिलांच्या साथीने मिळून ही मुलगी बॉम्बचा आवाज होताच हसण्याचा खेळ खेळतेय खरी. पण, तिला यामागच्या दाहक वास्तवाची मात्र पुसटशी कल्पनाही नाही. हेच हदयद्रावक चित्र एका व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट करत साऱ्या जगभर एका पत्रकारामुळे हा व्हिडिओ पोहोचला आहे. एकिकडे तुम्ही आनंदात, उत्साहात असतानाच दुसरीकडे कोणतरी जीवनातील वास्तवाच्या विस्तवात होरपळत आहे हे विसरुन चालणार नाही, हेच हा व्हि़डिओ सांगत आहे.