`मुलीला कसं सांगू की तिचा भाऊच तिचा बाप आहे,` महिलेने उघड केलं कुटुंबाचं धक्कादायक सत्य
नुकतंच एका महिलेने आपल्या कुटुंबाशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. आपल्या मुलीचा भाऊच तिचा बाप असल्याचं महिलेने सांगितलं आहे. पण ही गोष्ट आपल्या मुलीला सांगण्याची तिचा भीती वाटत आहे. ही स्थिती नेमकी कशी उद्भवली याबद्दल महिलेने सविस्तरपणे सांगितलं आहे.
प्रत्येक कुटुंबात अशा काही गोष्टी असतात, ज्या फक्त त्या चार भिंतीमधील लोकांनाच माहिती असतात. पण अनेकदा या चार भिंतीत राहणारेही एकमेकांपासून काही गोष्टी लपवून ठेवत असतात. या गोष्टी जर उघड झाल्या तर नाती संपुष्टात येत, कुटुंबात मोठा कलह निर्माण होण्याची शक्यता असते. याचं कारण एका महिलेने आपल्या कुटुंबाबद्दल असा खुलासा केला आहे, जो ऐकल्यानंतर तुमचं डोकं चक्रावेल. आपल्या मुलीचा भाऊच तिचा बाप असल्याचं महिलेने सांगितलं आहे.
"आधीपासूनच दोन मुलांचा बाप होता पती"
द अटलांटिकच्या डियर थेरेपिस्ट कॉलममध्ये महिलेने आपली ओळख लपवत हा खुलासा केला आहे. यामध्ये तिने आपल्याशी भेट होण्याआधी पतीचे कशाप्रकारे एका महिलेशी संबंध होते आणि तिच्यापासून दोन मुलं होती याची माहिती दिली आहे. लग्नानंतर जोडप्याने आपली मुलं जन्माला घालण्याचा विचार केला. पण पतीची नसबंदी झाली असल्याने ते शक्य होऊ शकलं नाही.
मूल जन्माला घालण्यासाठी निवडला अजब मार्ग
आपलं मूल आपल्यासारखंच दिसावं अशी त्यांची इच्छा होती. यामुळे त्यांनी एक अजब मार्ग शोधला. अटलांटिकला लिहिलेल्या पत्रात या अज्ञात महिलेने सांगितलं आहे की, "आम्हाला स्पर्म बँकेचा वापर करायचा नव्हता. यामुळे मग आम्ही पतीच्या मुलालाच डोनर होण्यास सांगितलं".
"तिचा बाप तिचा आजोबा आहे हे कसं सांगणार?"
महिलेने पुढे लिहिलं आहे की, "आम्हाला वाटलं हा फार योग्य निर्णय होता. यामुळे आमच्या मुलांमध्ये पतीचे जनुके असावे अशी आमची इच्छा होती. तसंच माझ्या सावत्र मुलाचं आरोग्य, बुद्धिमत्ता यांची आम्हाला चांगली कल्पना होती. तोदेखील मदत करण्यास तयार झाला होता".
"माझी मुलगी आता 30 वर्षांची आहे. तिच्या जन्माच्या तीन दशकांनंतरही आम्ही तिच्यापासून सत्य लपवलं आहे. आता तिला तिचे वडीलच आजोबा आहेत, तसंच तिचा भाऊ तिचा बाप आहे हे कसं सांगावं ही मोठी अडचण आमच्यासमोर आहे. याशिवाय तिची बहिण तिची आत्या आहे".
हे सर्व सांगितल्यानंतर आपली मुलगी काय प्रतिक्रिया देईल याचा अंदाज नाही. त्यामुळे आपल्याला फार चिंता सतावत असल्याचं तिने म्हटलं आहे. "माझ्या पतीसाठीही हे फार कठीण आहे. कारण त्यांना आपल्या मुलीला मीच तिचा बाप असल्याचं सांगायचं आहे," असं महिलेने म्हटलं आहे.
"माफी मागण्याआधी तिच्याशी बोला"
महिलेच्या पोस्टला उत्तर देताना मानसोपचारतज्ज्ञ आणि स्तंभलेखक लोरी गोटलिब यांनी सांगितलं आहे की, आपल्या मुलीची माफी मागण्याआधी तिच्यासह बसा आणि शांतपणे सगळं समजावून सांगा. 30 वर्षं आपण सत्य लपवलं याची जबाबदारी घेण्याचा आग्रह करताना त्यांनी सांगितलं आहे की, बोलताना तिच्यावर आपला हक्क गाजवू नका. तसंच मुलीच्या भावाशीही आधी चर्चा करा. जेणेकरुन त्याच्या प्रतिक्रियेमुळे तिला आश्चर्य वाटणार नाही असा सल्ला दिला आहे. हे सांगणं सोपं नाही, पण सत्य सांगणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.