Viral Video: आपल्या आवडत्या शहरात राहण्यासाठी चांगली जागा मिळावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काहींच्या नशिबाने त्यांचं घर असतं, तर काहीना मात्र भाड्याने घर घेऊन राहावं लागतं. त्यातही भाड्याने घर घेताना अनेकदा सुखसुविधांऐवजी जागेला प्राधान्य दिलं जातं. एकटे राहणारे तर छोट्याश्या घरातही वास्तव्य करतात. बरं ही स्थिती फक्त भारतात नाही तर जगभरात आहे. नुकताच लंडनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातून मोक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी लागणारे पैसे आणि त्या मोबदल्यात मिळणारी जागा स्पष्ट दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

@instablog9ja या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सेंट्रल लंडनमध्ये असणाऱ्या या घऱाचं भाडं ऐकून अनेकजण चक्रावले आहेत. धक्कादायक म्हणजे इतकं भाडं असतानाही जागा मात्र फारच छोटी आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


बेड, बाथरुम, शेल्फ अशा मूलभूत सुविधांचा असतानाही फ्लॅटचा आकार मात्र अनेकांच्या भुवया उंचावत आहे. लंडन युकेतील सर्वात महागडं शहर म्हणून ओळखलं जात असलं तरी हा व्हिडीओ आश्चर्यचकित करणारा आहे. इतक्याशा जागेसाठी इतके पैसे मोजावे लागत आहेत ही गोष्ट अनेकांना खटकली आहे. 



एका तरुणीने हा व्हिडीओ शेअर केला असून, लंडनमधील भाड्याची घरं कशी असतात आणि त्यासाठी किती पैसे मोजावे लागतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रुममध्ये गेल्यानतर एका बाजूला छोटी बेडरुम दिसत आहे. जिथे बेड आणि शोकेस दिसत आहे. तसंच टीव्ही लावण्यात आला आहे. यानंतर दुसऱ्या बाजूला एकत्रित शौचालय आणि बाथरुम आहे. या एवढ्याशा घरासाठी 1 लाख 90 हजार भाडं देत असल्याचं तरुणी व्हिडीओत सांगत आहे. 


हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत. अनेक नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून, लंडनमधील ही स्थिती आपल्याला माहितीच नव्हती असं सांगत आहेत. इतक्याशा छोट्या फ्लॅटसाठी इतके पैसे मोजावे लागत आहेत यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही आहे. 


एका युजरने म्हटलं आहे की, "एक उत्कृष्ट सुसज्ज आणि प्रशस्त अपार्टमेंट पाहण्याची आशा होती. परदेश म्हणजे एक घोटाळा आहे. जर तुमच्याकडे पैसे असतील तर नायजेरियात राहा आणि तुमच्या पैशाचा आनंद घ्या".


“प्रत्येकाला लंडनमध्ये राहायचे आहे. पण यूकेमध्ये आरामात राहण्याची इतर ठिकाणे आहेत,” असं दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे. तर एकाने लिहिलं आहे की, "हसण्याचा अर्थ असा नाही की एखादी व्यक्ती आनंदी असते. काहीवेळा याचा अर्थ असा होतो की ते त्यांच्या स्वतःच्या समस्यांना तोंड देण्यास सक्षम आहेत".