Viral News: पती-पत्नीचं नातं म्हटल तर त्यात प्रेम, भांडण, राग, मत्सर अशी प्रत्येक भावना असते. अनेकदा तर पती-पत्नी एकमेकांपासून काही गोष्टी लपवून ठेवतात. ही गोष्ट आपल्या पार्टनरला कळू नये यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण जेव्हा ही गोष्ट उघड होते तेव्हा होणारे वादही मोठे असतात. अशाच एका घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पतीने पत्नीपासून लाखो रुपये लपवून ठेवले होते. पण पत्नीने चादर सुकवायला घेतली आणि सगळा भांडाफोड झाला. South China Morning Post ने यादसंदर्भात वृत्त दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये ही घटना घडली आहे. पतीने पत्नीपासून लपवून चादरीच्या आतमध्ये लाखो रुपये लपवून ठेवले होते. पण अपघाताने हे पैसे पत्नीच्या हाती लागले. सेंट्रल चीनमधील Anhui प्रांतात ही घटना घडली असून तेथील सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या जोडीदारापासून एखादी गोष्ट लपवण्यासाठी एखादा पती कुठपर्यंत जाऊ शकतो याची चर्चा सुरु आहे. तशी ही घटना जुनी आहे, पण नव्याने ती चर्चेत आली आहे. 


फेब्रुवारी 2021 मध्ये पत्नी घराची स्वच्छता करत होती. यावेळी तिने चादर स्वच्छ केल्यानंतर सुकवण्यासाठी बाल्कनीत नेली. पण जेव्हा तिने चादर उघडली तेव्हा तिला धक्काच बसला. कारण त्यातून पैशांचा पाऊस सुरु झाला. अचानक पडलेले हे पैसे तळमजल्यापर्यंत पडू लागले होते. 


या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये महिला आपल्या शेजाऱ्यांना सांगत आहे की, "एक मिनिट थांबा, मी खाली येऊन हे पैसे उचलते".


व्हिडीओच्या शेवटी महिला सांगत आहे की, पतीने आपल्याला बोनसमध्ये हे 30 हजार युआन (3 लाख 59 हजार)मिळाल्याची कबुली दिली आहे. 


या घटनेनंतर अनेकजण सोशल मीडियावर कमेंट करत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, "लाखो रुपये हवेत उडत असल्याचं पाहून पत्नीचे हात थरथरु लागले असतील". तर एकाने म्हटलं आहे की, "पत्नी देवीप्रमाणे आहे, जी नोटांचा पाऊस पाडत आहे".


दरम्यान काहीजणांनी तिच्या पतीवरही टीका केली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की "गुपचूप पैसे जमा करणाऱ्यांनी घराची साफसफाई होण्याआधी हे पैसे ट्रान्सफर करावेत". ही कमेंट करणाऱ्या व्यक्तीलाही असाच अनुभव आला होता. त्याच्या पत्नीला त्याने बेडच्या खाली लपवलेले पैसे सापडले होते. आपण जवळपास एक वर्ष पैसे जमा करत होतो, जे काही क्षणात पत्नीच्या हाती लागले असं त्याने सांगितलं आहे. 


आपला किस्सा सांगताना त्याने माहिती दिली की, "जेव्हा मला काम केल्यावर पैसे मिळायचे, तेव्हा मी बेडच्या खाली ते ठेवून द्यायचो. मी नेमके किती पैसे जमा केले होते याची मला कल्पना नाही". दरम्यान अनेकांनी अशा व्हिडीओंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चीनमध्ये आता किती लोक रोख पैसे वापरतात अशी विचारणा त्यांनी केली आहे.