‘अदानी एण्टरप्राइझेस’ला ऑस्ट्रेलियात झटका, नागरिकांची निदर्शने, कोळसा खाणीला विरोध
‘अदानी एण्टरप्राइझेस’ही भारतातील एक बडी आंतरराष्ट्रीय कंपनी. या कंपनीविरोधात ऑस्ट्रेलियात मोठी निदर्शने सुरू आहेत. कंपनीच्या प्रस्तावित कारमायकेल कोळसा खाणीविरोधात ही निदर्शने सुरू आहेत.
सिडनी : ‘अदानी एण्टरप्राइझेस’ही भारतातील एक बडी आंतरराष्ट्रीय कंपनी. या कंपनीविरोधात ऑस्ट्रेलियात मोठी निदर्शने सुरू आहेत. कंपनीच्या प्रस्तावित कारमायकेल कोळसा खाणीविरोधात ही निदर्शने सुरू आहेत.
कारमायकेल कोळसा खाण ‘अदानी एण्टरप्राइझेस’चा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पाचा एकूण विचार करता ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी खाण ठरण्याचा बहुमान या खाणीला मिळण्याची संधी होती. मात्र, मात्र पर्यावरण आणि आर्थिक प्रश्नांमुळे त्यास आता विलंब झाला आहे. ही खान ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड राज्यात असून, या खाणीमुळे ग्लोबल वॉर्मिगवर परिणाम होत आहे. हे असेच सुरू राहिले तर, ग्रेट बॅरिअर रीफला धोका निर्माण होईल, असा दावा पर्यावरणाशी संबंधित गटाने केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी ‘स्टॉप अदानी’ चळवळच उभारली आहे.
‘अदानी एण्टरप्राइझेस’विरोधातील आपला विरोध अधिक तीव्र करण्यासाठी नागरिकांनी सुमारे ४५ ठिकाणी निदर्शने केली. त्यासाठी एक हजारहून अधिक नागरिकांनी मानवी साखळी करत 'स्टॉप अदानी' असे चिन्ह तयार केले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियातील निम्म्याहून अधिक नागरिकांचा या खाणीला विरोध आहे. करदात्यांच्या पैशातून या खाणीला अब्जावधी डॉलर्सचे कर्ज देण्यात आल्याबद्धल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, हा प्रकल्प यशस्वीपणे पार पडेल. तसेच, या प्रकल्पातील स्वामित्वधन आणि कराच्या रूपाने अब्जावधी डॉलर्सचा फायदा होईल. देशात रोजगारनिर्मिती होईल आणि भारतात कोळसा निर्यात केल्याने ग्रामीण भागांत विजेचा पुरवठा करण्यास मदत मिळेल, असा ‘अदानी एण्टरप्राइझेस’चा दावा आहे.
प्राप्त माहितीनुसार, नॉर्दर्न ऑस्ट्रेलियन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीकडून (एनएआयएफ) प्रस्तावित खाणीला जोडणाऱ्या रेल्वेसाठी ७०४ दशलक्ष डॉलरचे कर्ज मिळणार आहे. मात्र, मात्र वाणिज्यिक बँकांनी सर्व कर्ज उचलल्यास आम्हाला एनएआयएफची गरजच नाही, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार जनकराज यांनी माहिती देताना म्हटले आहे.