तालिबानचं फर्मान! महिलांवर सशर्त प्रवासबंदी, पुन्हा क्रूर चेहरा समोर
महिलांच्या जगण्यावरच वेसण...
काबुल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) ऑगस्ट महिन्यात तालिबान सत्तेवर आल्यानंतर लगेचच तिथं काही महत्त्वाचे बदल घडण्यास सुरुवात झाली. साऱ्या जगानं या बदलांकडे विविध दृष्टीकोनांतून पाहिलं. आता म्हणे पुन्हा एकदा तालिबानचा (Taliban) क्रूर चेहरा त्याच्या नव्या कायद्यांतून डोकावत आहे.
सध्या समोर आलेल्या वृत्तानुसार तालिबानकडून महिलांच्या लांब पल्ल्याच्या बस प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.
इतकंच नव्हे, तर एकट्या महिलेनं बस किंवा अन्य कोणत्या वाहनानं एकट्यानं प्रवास करणं ठराविक अंतरापुरतंच मर्यादित ठेवण्यात आलं आहे.
कारमध्ये म्युझिक लावण्यावरही बंदी घालण्याचं फर्मान तालिबानकडून काढण्यात आलं आहे.
महिलांनी प्रवास करताना हिजाब घातलेला असणं बंधनकारक असणार आहे.
मुलींच्या शिक्षणाबाबत काही अनपेक्षित निर्णय घेणाऱ्या तालिबानकडून आलेलं हे फर्मान साऱ्या जगाच्या भुवया उंचावत आहे.
जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशात तालिबाननं नमूद केलं आहे की, 70 किमीहून अधिक अंतर महिलांना एकट्यानं प्रवास करता येणार नाही.
असं करायचं झाल्यास महिलेसोबत जवळचा कोणीही एक पुरुष असणं बंधनकारक असेल.
मुख्य म्हणजे लांब अंतरावर प्रवास करणाऱ्या महिलांना वाहनात घेऊ नये असे आदेशही तालिबाननं काढले आहेत.
एकिकडून आपण प्रगतीपथावर असल्याचा दावा करणाऱ्या तालिबानचं हे रुप खरंच ही प्रगती कोणत्या दिशेनं सुरु आहे, असाच प्रश्न उपस्थित करून जात आहे.
तालिबान सरकारचे प्रवक्ते सादिक अकीफ मुहादिरनं दिलेल्या माहितीनुसार, महिलांसोबत पुरुष नातेवाईक सोबत असायलाच हवा.
काही आठवड्यांपूर्वीच तालिबानकडून महिलांची नाटकं, चित्रपट, मालिका यांचं टेलिव्हिजन प्रसारण बंद करण्यात आलं आहे.
महिला पत्रकारांनी टीव्हीवर येतानाही हिजाब घालणं बंधनकारक असल्याचा आदेश दिला होता.