तालिबान सरकारचा अजब आदेश, आता महिलांकडून हे अधिकारही हिरावून घेतले
तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. आता नव्या आदेशानुसार पुरुष सोबत असतील तरच महिलांना असेल ही परवानगी
काबुल : अफगाणिस्तानचा (Afghanistan) ताबा घेतल्यापासून तालिबानने (Taliban) महिलांसाठी अनेक तुघलकी आदेश जारी केले आहेत. आता तर तालिबानने महिलांचं विमान प्रवासाचं स्वातंत्र्यही हिरावून घेतलं आहे. महिलांना पुरुष नातेवाईक असल्यासच विमानात बसण्याची परवानगी देण्याचे आदेश तालिबानी सरकारने विमान कंपन्यांना दिले आहेत.
पुरुष नातेवाईक नसल्यास विमान प्रवासावर बंदी
तालिबान सरकारने महिलांना पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करण्यास परवानगी न देण्याचे आदेश दिल्याची माहिती अफगाणिस्तानच्या एरियाना अफगाण एअरलाइन आणि काम एअरच्या दोन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तालिबानचे प्रतिनिधी, दोन विमान कंपन्या आणि विमानतळ इमिग्रेशन अधिकारी यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. आता या नव्या निर्बंधांमुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. या निर्णयाबाबत अफगाणिस्तानच्या संबंधित मंत्रालयाने मात्र असे कोणतेही निर्देश जारी केले नसल्याचं म्हटलं आहे. पण विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचं म्हटलं आहे. या आदेशानंतर एकट्या महिलेच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे.
महिलांना विमानात चढण्याची परवानगी नाकारली
फ्लाइटमधील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार काही महिला ज्या पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करत होत्या त्यांना शुक्रवारी काबुल-इस्लामाबाद कामा एअर फ्लाइटमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली नाही. दुसऱ्या एका घटनेत यूएस पासपोर्ट असलेल्या अफगाण महिलेला शुक्रवारी दुबईच्या फ्लाइटमध्ये चढण्याची परवानगी नाकारण्यात आली.
तालिबानमधील महिलांना बहुतांश सरकारी नोकऱ्या आणि माध्यमिक शालेय शिक्षणातून बाहेर काढण्यात आलं आहे.