मालकिणीच्या आवाजात पोपटानं ऑर्डर केलं आइस्क्रीम, सुका मेवा आणि...
पोपटानं मालकिणीच्या आवाजात चक्क ऑनलाईन ऑर्डर देऊन टाकली...
नवी दिल्ली : आपल्या ओळखीच्या माणसांचं बोलणं कॉपी करणं आणि त्यांचा आवाज हुबेहुब पद्धतीनं काढण्याची खुबी एकाच पक्षाला खूप चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे... तो म्हणजे पोपट... इथंपर्यंत ठिक होतं...पण ब्रिटेनमधल्या एका करड्या रंगाच्या पोपटानं (grey parrot) चक्क आपल्या मालकिणीच्या आवाजात ऑनलाईन ऑर्डर देऊन टाकली... इतकंच नाही तर व्हर्च्युअल असिस्टंटच्या मदतीनं आइस्क्रीमशिवाय अनेक फळ आणि भाज्यांची ऑर्डरही या पोपटानं अशा पद्धतीनं दिली की ऑर्डर घेणाऱ्यालाही समोर फोनवर माणूस नाही तर पोपट आहे याची इत्किंचितही कल्पना आली नाही. अमेझॉनच्या 'अॅलेक्सा' या व्हर्च्युअल असिस्टंटच्या मदतीनं पोपटाला हे शक्य झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्ट स्पीकर अॅलेक्साच्या मदतीनं पोपटानं मालकिणीच्या आवाजात वेगवेगळं सामान ऑनलाईन पद्धतीनं ऑर्डर केलं.
'रोको' नावाच्या या आफ्रिकन करड्या पोपटानं अमेझॉनवर आइस्क्रीम, टरबूज, सुका मेवा आणि ब्रोकोलीही ऑर्डर केली. त्यानंतर त्यानं या लिस्टमध्ये लाईट बल्ब आणि पतंगही जोडलं. या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा पोपटाची मालकीण मॅरियन यांना धक्काच बसला.
रोको नावाचा हा पोपट अगोदर बर्कशायरस्थित नॅशनल अॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट सॅक्चुरीमध्ये राहत होता. तिथून अति बडबडीमुळे त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. याच नॅशनल अॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट सॅक्चुरीमध्ये काम करणारी मॅरियन त्याला आपल्या घरी घेऊन आल्या होत्या.