तेहरान : महिला बऱ्याच क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर वाटचाल करत असल्या तरीही काही राष्ट्रांमध्ये अद्यापही त्यांच्यावर असणारे निर्बंध कमी झालेले नाहीत. यातच एक आशावादी गोष्ट घडली आहे. इराणमध्ये गेल्या कित्येक दशकांपासून असणारे निर्बंध मोडित काढत अखेर गुरुवारी महिलांना मैदानात जाऊन फुटबॉल सामन्याचा याची देही याची डोळा आनंद घेता आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इराणची राजधानी तेहरान येथील आझादी स्टेडियममध्ये जवळपास ४० वर्षांनंतर या अनोख्या स्वातंत्र्याच्या क्षणाचा अनुभव येथे उपस्थित महिलांना घेता आला. गुरुवारी येथे इराण आणि कंबोडिया या राष्ट्रांच्या फुटबॉल संघांदरम्यान, पात्रता फेरीसाठीचा सामना खेळण्यात आला होता. याच सामन्यासाठी या महिला स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या. 


महिलांसाठीच खास तयार करण्यात आलेल्या एका स्टँडमध्ये त्यांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या हातात राष्ट्रध्वज होता. शिवाय त्यांचा उत्साहसुद्धा पाहण्याजोगा होता. 


आशिया खंडातील एक प्रभावी संघ म्हणून इराणच्या संघाकडे पाहिलं जातं. अशा या संघाने पात्रचा फेरीसाठीच्या सामन्य़ात कंबोडियाच्या संघावर १४- ० अशा फरकाने मात केली. हा सामना इराणच्या विजयासाठी स्मरणात राहण्यासोबत महिलांनी त्याचं साक्षीदार होणं, यासाठीही कायमच स्मरणात राहणार आहे. 


१९७९ मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये पुरुषांचे खेळ पाहण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार गेल्या महिन्यातच इराणमधील एका फुटबॉल प्रेमी सहर खोदयारी यांच्या मृत्यूनंतर फिफाने तेहरानमध्ये एक प्रतिनिधी मंडळ पाठवलं होतं. मैदानात जाऊन महिलांना फुटबॉल सामन्याचा आनंद घेता येईल याबाबतची निश्चितता करता यावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. 



सहरचा मृत्यू कसा झाला होता? 


पुरुषाचा वेश परिधान करत सहर मैदानात घुसण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आपल्याला अशा प्रकारे अटक केली जाण्याचा विरोध करत तिने स्वत:ला पेटवून घेतलं होतं. या घटनेनंतर इराणमध्ये महिलांवरील या निर्बंधाविरोधात अनेक पावलं उचलण्यात आली होती. सहर या ठिकाणी 'ब्ल्यू गर्ल' म्हणून ओळखली जाते. हा तिच्या आवडीच्या संघाचा म्हणजेच 'एस्तेगलाल'चा रंग आहे.