भारतीय पत्रकाराची हत्या; मृत्यू साजरा करणाऱ्यांना अभिनेत्याने चांगलंच सुनावलं
युद्धभूमीवर एखाद्या पत्रकाराचा मृत्यू हा एखाद्या सैनिकाच्या मृत्यूसारखाच असतो. दानिशचा मृत्यू साजरा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एवढचं सांगेन
मुंबई : अफगाणिस्तानमध्ये भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांची हत्या करण्यात आली आहे. रॉयटर्स या संस्थेसाठी काम करत होते दानिश. अफगाणिस्तानच्या टोलो या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. सिद्दीकी यांची हत्या स्पिन बोल्डक इलाके (Spin Boldak Area)या परिसरात झाली आहे. जे कंधार प्रांतात येते. यावेळी कंधारमध्ये भीषण हिंसा होत आहे. सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून कंधारमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीचा आढावा घेत होते.
पत्रकार दानिश सिद्दकी यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर काही जणांनी त्यांनी कोरोनाची दाहकता दाखवण्यासाठी काढलेले फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह पोस्ट केल्या. अनेकांनी भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करणारे फोटो दानिशने काढायचा आरोप ही केलाय. यावरुन आता एका अभिनेत्याने दानिश यांचा मृत्यू साजरा करणाऱ्यांचा नाश होवो असं ट्विट केलंय.
सोशल मीडियावरील कमेंट्समुळे नेहमीच चर्चेत असणारा दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूसंदर्भात एक ट्विट शेअर केलं आहे. दानिश सिद्दिकी यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांचा मृत्यू साजरा करणाऱ्यांना अभिनेत्याने ट्विटरवरुन टोला लगावला आहे.
सिद्धार्थने ट्विटमध्ये लिहिलंय, "तुझ्या आत्म्याला शांती मिळो दानिश सिद्दकी. मी तुझ्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. मी तुझ्या आयुष्याला सलाम करतो. आम्ही नेहमीच तुझी खूप अभिमानाने आठवण काढू. युद्धभूमीवर एखाद्या पत्रकाराचा मृत्यू हा एखाद्या सैनिकाच्या मृत्यूसारखाच असतो. दानिशचा मृत्यू साजरा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एवढचं सांगेन की, तुमचा नाश होवो, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतोय."
सध्या सिद्धार्थचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे. अनेकांनी या ट्विटवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.