आधी कोंबडी की आधी अंड? उत्तर दिलं नाही म्हणून मित्राने जिगरी मित्राला... धक्कादायक घटना
Ajab Gajab : क्षुल्लक कारणाने एका मित्राने आपला सख्ख्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोघंही मित्र दारुच्या नशेत होते. यावेळी एका मित्राने दुसऱ्याला एक प्रश्न विचारला. याचं उत्तर देता न आल्याने मित्रानेच मित्राची हत्या केली.
Which came first The chicken or the Egg : आधी कोंबडी की आधी अंड? हा प्रश्न आपण लहानपणापासून ऐकला असेल. या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत अनुत्तरीत आहे. पण या प्रश्नामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो असा कधी विचारही केला नसेल. प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. आधी कोंबडी की आधी अंड? या प्रश्नाचं उत्तर न देता आल्याने एका तरुणाने आपल्या सख्ख्या मित्राचा खून केला. घटनेआधी दोन्ही मित्रांनी दारू पार्टी केली. त्यानंतर दारुच्या नशेत असताना एका तरुणाने आपल्या मित्राला हा प्रश्न विचारला. पण या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही.
नेमकी काय आहे घटना?
ही धक्कादायक घटना इंडोनेशियातली (Indonesia) आहे. इथल्या दक्षिण-पूर्व सुलावेसी प्रांतात डीआर नावाच्या तरुणाने आपला जिगरी मित्र कादिर मार्कसला दारू पार्टीसाठी बोलावलं. पार्टी चांगलीच रंगली. दोघंही दारुच्या नशेत असताना डीआरने कादिरला एक प्रश्न विचारला. आधी कोंबडी की आधी अंड? (Which came first The chicken or the Egg?) याचं उत्तर काय असं डीआरने कादिरला विचारलं. पण कादिरला या प्रश्नाचं उत्तर देता आला नाही. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. क्षुल्लक गोष्टीवरुन सुरु झालेला हा वाद टोकाला पोहोचला. वाद वाढत असल्याचं पाहून कादिर मार्कस तिथून निघाला.
मार्कसचा पाठलाग करुन हत्या
कादिर तिथून निघून गेल्याने डीआर आणखी संतापला. त्याने कादिरचा पाठलाग केला. काही अंतरावर कादिरला गाठत डीआरने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कादिर गंभीर जखमी झाला. आसपासच्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण अति रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान कादिरचा मृत्यू झाला.
घटनेनंतर इंडोनेशिया पोलिसांनी आरोपी डीआरला अटक केलीय. दोघंही नशेत होते आणि त्यातूनच ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्रही जप्त केलं आहे. दोषी सापडल्यास डीआरला 18 वर्षांची शिक्षा होऊ शकते, असं पोलिसांनी सांगितलं.