900 Crore heist by Tunneling Into The Vault: 19 जुलै 1976 रोजी फ्रान्समधील नीस शहरामध्ये एक फारच धक्कादायक घटना घडली. त्याकाळात जगातील सर्वात सुरक्षित बँक अशी ओळख असलेल्या सोसायटी जनरल बँकेत दरोडा पडला होता. या बँकेत कॅश ठेवली जाणारी तिजोरी ही जगातील सर्वात सुरक्षित मानली जायची. येथे चोरी होणं शक्यच नाही असं म्हटलं जायचं. रोज या तिजोरीचा दरवाजा उघडल्यानंतर फारच सावधपणे कर्मचारी त्यामध्ये प्रवेश करायचे. 19 जुलै 1976 लाही असाच प्रयत्न येथील कर्मचाऱ्यांनी केला. ही तिजोरी तब्बल 20 टन वजनाची होती. अनेकदा या तिजोरीचा महाकाय दरवाजा उघडण्यास अचडण यायची. या तिजोरीचं लॉक अनेकदा अडकायचं. ही तिजोरी बनवणाऱ्या कंपनीचीही अनेकदा मदत घ्यावी लागायची. 


नेहमीसारखा दिवस सुरु झाला पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 जुलै 1976 रोजी अशाच प्रकारे या तिजोरीच्या लॉकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कर्मचाऱ्यांना वाटलं. त्यांनी तिजोरी बनवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. अर्ध्या तासात या कंपनीचे तज्ज्ञ बँकेत दाखल झाले. त्यांनी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही हा दरवाजा उघडता आला नाही. अनेकदा प्रयत्न करुनही त्यांच्या हाती अपयशच आलं. दुसरीकडे बँकेबाहेर ग्राहकांची मोठी रांग लागली. अखेर 3 तासानंतर बँक अधिकारी आणि तिजोरी बनवणाऱ्या कंपनीच्या तज्ज्ञांनी ड्रील करुन लॉक नेमकं का अडकलं आहे हे तपासून पाहण्याचा निर्णय घेतला. या तिजोरीच्या दारावर कोणत्याही प्रकारचे निशाण नव्हते ज्यावरुन कोणीतरी यामध्ये छेडछाड केल्याचं वाटवं. त्यामुळेच या तिजोरीच्या दरवाजाला ड्रीलने होल पाडून आत पाहिलं असता अनेकांची झोप उडाली. कोणीतरी वेल्डींग करुन या तिजोरीचा दरवाजा आतून बंद केला होता. हे पाहून बँक अधिकारी, कर्मचारी आणि तिजोरी बनवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला. या तिजोरीत जाण्याचा एकच दरवाजा असल्याने असं कसं झालं हे कोणालाच कळेना. या तिजोरीला दुसरा दरवाजा किंवा झापड नव्हती. त्यामुळेच ही तिजोरी कोणी आजून वेल्डींग करुन बंद केली हा प्रश्न अनेकांना पडला.


समोरचं दृष्य पाहून बसला धक्का


त्यानंतर भिंतीला मोठं भगदाड पाडून आतमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही भिंतही फारच मजबूत होती. या भिंतीला भगदाड पाडणं शक्य नव्हतं. या भिंतीमध्ये लोखंडाचाही वापर करण्यात आलेला. मात्र अनेक तासांच्या प्रयत्नानंतर भिंतीला एखादी व्यक्ती आत जाईल इतकं भगदाड पाडण्यात आलं. आतील दृष्य पाहून अनेकांना धक्काच बसला. या मुख्य तिजोरीमधील लॉकर्स तोडण्यात आले होते. स्प्रेच्या सहाय्याने या तिजोरीच्या आतील बाजूमध्ये काहीतरी लिहिण्यात आलं होतं. 'Sans armes sans haine et sans violence' असे हे शब्द होते. या शब्दांचा अर्थ 'कोणत्याही शस्त्राचा, द्वेषाचा किंवा हिंसेचा वापर न करता' असा होता. जमीनीमध्ये एक खड्डा खणल्याचं कर्मचाऱ्यांना दिसलं. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला. हा खड्डा म्हणजे एक भुयार होतं. हे भुयार थेट शहरातील सर्वात मोठ्या भूमिगत नाल्यापर्यंत जात होतं.


बरंच सामान सापडलं


पोलिसांना या नाल्यात मोठ्या प्रमाणात सामान सापडलं जे चोरांनी वापरलं होतं. यामध्ये 27 सिलेंडर्सचाही समावेश होता. या सिलेंडरचाच चोरांनी दरवाजाला आतून वेल्डींग करण्यासाठी वापर केला. नाल्यामध्ये ताजी हवा मिळावी म्हणून चोरांनी व्हेंटीलेटर उपकरणांचाही वापर केला होता. 'द गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार 20 मिलियन डॉलर्सहून अधिक रक्कमवेर चोरांनी डल्ला मारला. आजच्या दरानुसार ही रक्कम 110 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 900 कोटी रुपये इतकी होती. हा त्या काळातील सर्वात मोठा बँक दरोडा होता.


गर्लफ्रेण्डमुळे झाला भांडाफोड


फ्रान्समधील या मोठ्या दरोड्याची माहिती जगभरामध्ये पसरली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. 3 महिन्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर 1976 मध्ये पोलिसांना या चोरीसंदर्भात महत्त्वाचा पुरावा सापडला. या चोरांच्या टोळीतील एक आरोपी त्याच्या प्रेयसीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आधी त्याने गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने तोंड उघडलं आणि या चोरीत सहभागी असलेल्यांबद्दलची माहिती दिली. 


मास्टरमाईंड सापडला अन्...


या टोळीतील इतरांना अटक करण्यात आली असता हे लोक छोट्या-मोठ्या चोऱ्या करायचे अशी माहिती समोर आली. पोलिसांना सुरुवातीला या लोकांनी एवढी मोठी चोरी केलीय यावर विश्वास बसत नव्हता. मात्र नंतर या चोरांचा मोऱ्हक्या इतर कोणीतरी असल्याची माहिती समोर आली. या मोऱ्हक्याचं नाव होतं, अल्बर्ट स्पाजियारी. अल्बर्ट पेशाने एक फोटोग्राफर होता. पोलिसांनी अल्बर्टला अटक केली तेव्हा त्याने सरळ पोलिसांना आपल्याच नेतृत्वाखाली ही चोरी करण्यात आल्याची कबुली दिली. अल्बर्टने आपण या बँकेत लॉकरची सुविधा घेतली होती अशं सांगितलं. लॉकर वापरण्याच्या बहाण्याने त्याने या तिजोरीचे आतून बरेच फोटो काढले होते.


कशी केली चोरी?


अल्बर्टने त्याने घेतलेल्या लॉकरमध्ये एक अलार्म क्लॉक ठेवलं होतं. या घड्याळाचा अलार्म रात्रीच्या वेळी वाजायचा. मात्र याची दखल कोणीच घेत नसल्याचं अल्बर्टला जाणवलं. यावरुन तिजोरीमध्ये कोणतीही विशेष सुरक्षा नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर अल्बर्टने शहर नियोजन कार्यालयामध्ये शहराचा नकाशा चोरला. यामध्ये भूअंतर्गत नाले कुठून कसे वाहतात याची माहिती होती. त्याने सर्व आकडेमोड करुन याला नाल्यामधून 26 फुटांचं भुयार केलं तर ते थेट बँकेच्या तिजोरीपर्यंत जाईल असं लक्षात आलं. मात्र हे भुयार खोदण्याचं काम फार कष्टाचं होतं. त्यामुळे त्याने एका गँगस्टरशी संपर्क साधून आपला प्लॅन सांगितलं. त्याने आपल्या लोकांना कामावर लावलं. हे भुयार खोदण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागला. कोणत्याही मशीनचा वापर न करता हे खोदण्यात आल्यानं एवढा कालावधी लागला. हे भुयार खोदण्याचं काम केवळ रात्रीच केलं जायचं.


27 तासांमध्ये काढले पैसे


त्यानंतर 18 जुलै 1976 रोजी हे भुयार तिजोरीजवळ उघडलं. पुढील 27 तास हे चोर तिजोरीमधील पैसा या नाल्यावाटे चोरत राहिले. याच तिजोरीत त्यांनी दोन्ही वेळेचं जेवणही केलं. त्यानंतर चोरी करुन ते या तिजोरीमधून फरार झाला. पोलिसांनी कबुली जबाब नोंदवून घेतल्यानंतर अल्बर्टला कोर्टासमोर हजर केलं. कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


न्यायाधिशांसमोरुन पळाला


कोर्टामध्ये अल्बर्टने चोरलेली रक्कम आणि सोनं कुठे ठेवलं आहे याची माहिती न्यायाधिशांना कोड स्वरुपामध्ये एका कागदावर लिहून दिली. आपण याबद्दलची माहिती केवळ न्यायाधिशांना देणार असल्याचं अल्बर्टचं म्हणणं होतं. न्यायाधिशांच्या कक्षेत बोलावून त्याच्याकडून कोडबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने संधीचा फायदा घेत खिडकीतून उडी मारुन पळ काढला. त्याने उडी मारली त्या ठिकाणी आधीपासूनच एक दुचाकी उभी होती. अल्बर्ट या दुचाकीवरुन पळून गेली. पोलिसांनी बरेच प्रयत्न केले मात्र त्याला अटक करण्यात त्यांना अपयश आलं.


एक मुलाखत आली अन् परत गायब


अनेक वर्षानंतर अल्बर्टची एक मुलाखत इटलीमधील एका वृत्तवाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यामध्ये त्याने वयाच्या 12 व्या वर्षापासून आपल्याला गुप्त खजिने शोधाण्याची आवड लागली होती असं सांगितलं. याच आवडीमधून आपण बँकेत डाका टाकल्याचं अल्बर्टने सांगितलं. यानंतर अल्बर्ट कुठे गायब झाला हे कोणालाच ठाऊक नाही. त्यानंतर 8 जून 1989 मध्ये अल्बर्टचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घराच्या बाहेरच ठेवलेला असं अल्बर्टच्या आईने सांगितलं.