अॅमेझॉन आग : २० टक्के ऑक्सिजन देणाऱ्या खोऱ्यात कार्बन, नऊ देशांना धुराचा परिणाम
अॅमेझॉन जंगलातील आग अद्याप धुमसत आहे. तिथल्या धुराचा परिणाम दक्षिण अमेरीकेच्या नऊ देशांमध्ये झाल्याचे दिसत आहे.
ब्राझीलिया : अॅमेझॉन जंगलातील आग अद्याप धुमसतेय. तिथल्या धुराचा परिणाम दक्षिण अमेरीकेच्या नऊ देशांमध्ये झाल्याचे दिसत आहे. दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यांपर्यंत हा विषारी धूर पसरला आहे. जंगलातील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. पण त्यांना यश येत नाही. लष्कराचे जवानही मदतीसाठी पुढे सरसावलेत पण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. दरम्यान, जगात २० टक्के ऑक्सिजन देणारा अॅमेझॉनचे समृद्ध जंगल आता कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइडने भरुन गेले आहे.
अमॅझॉन नदीच्या दोन्ही किनाऱ्याच्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलात आग पसरलीये. ब्राझीलला सर्वाधिक फटका बसलाय. देशातील रोराईमा, एक्रे, आणि रॉडोनिया भागात आग नियंत्रणात येत नाही. अमेझोनास आणि ग्रोसो डो सूल परिसरातही आग वेगाने पसरत आहे.
देशात आणिबाणीची घोषणा करण्यात आली आहे. आगीमुळे ब्राझीलमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. दक्षिण अमेरिकेच्या ९ देशांमध्ये आगीचा परिणाम जाणवत आहे. या देशातील हवेमध्ये हा धूर मिसळला आहे.
अमॅझॉन जंगलातील आगीमुळे पराग्वे आणि बोलिविया हे देशसुद्धा हवालदिल झालेत. ब्राझीलमधील आग या देशांच्या सिमेपर्यंत पोहोचली आहे. बोलिवियामध्ये मदतीसाठी लष्काराला तैनात करण्यात आले आहे. जगात २० टक्के ऑक्सिजन देणारा अॅमेझॉनचे समृद्ध जंगल आता कार्बन डायऑक्साइड और कार्बन मोनोक्साइडने भरुन गेले आहे.
सुमारे २० दिवसांपासून हे जंगल धगधगत आहे आणि आता आग नागरी वस्तींपर्यंत येऊन पोहोचलीये. शेकडो जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. पक्षांनाही फटका बसलाय. बोलिविया भागात अग्निशमन दलाच्या जवानांनी काही पक्षांना पाणी पाजून जीवदान दिले आहे.
बघता बघता जंगलातील छोटी-मोठी झाडे जळून खाक होतायेत. हेलिकॉप्टर, विमानांच्या सहाय्यांने आग विझवण्यातं यश आलं नाही. लपून बसलेले अॅनाकोंडाही आगीमुळे हैराण झाले आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी हा मोठमोठे सापही धडपड करत आहेत.
या आगीमुळे संपूर्ण जग हैराण आहे. पर्यावरणप्रेमी चिंता व्यक्त करतायेत. सरकारला समजत नाही आग कशी विझेल? आगीची ही धग नागरी वस्तीपर्यंत जाण्याचा धोका आहे. निसर्गाप्रती माणूस वेळीच जागृत झाला नाही तर भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल.